नागपुरात अंध व अपंगांचे राज्यस्तरीय साहित्य व कला संमेलन शनिवारपासून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2018 00:16 IST2018-11-15T00:10:02+5:302018-11-15T00:16:28+5:30
येत्या १७ नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या अंध व अपंगांच्या दोन दिवसीय राज्यस्तरीय समाजोत्थान साहित्य व कला संमेलनाचे उद्घाटन प्रसिद्ध अभिनेते मकरंद अनासपुरे यांच्या हस्ते होणार आहे. नामांकित हास्य कवी एहसान कुरेशी यांच्या कवितांसह ज्येष्ठ समाजसेवक डॉ. विकास आमटे संचालित अंध व अपंग ५० कलावंतांचे सादरीकरण संमेलनाच्या उदघाटन समारोहाचे मुख्य आकर्षण ठरणार आहे.

नागपुरात अंध व अपंगांचे राज्यस्तरीय साहित्य व कला संमेलन शनिवारपासून
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : येत्या १७ नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या अंध व अपंगांच्या दोन दिवसीय राज्यस्तरीय समाजोत्थान साहित्य व कला संमेलनाचे उद्घाटन प्रसिद्ध अभिनेते मकरंद अनासपुरे यांच्या हस्ते होणार आहे. नामांकित हास्य कवी एहसान कुरेशी यांच्या कवितांसह ज्येष्ठ समाजसेवक डॉ. विकास आमटे संचालित अंध व अपंग ५० कलावंतांचे सादरीकरण संमेलनाच्या उदघाटन समारोहाचे मुख्य आकर्षण ठरणार आहे.
संमेलनाचे संयोजक आमदार प्रकाश गजभिये यांनी बुधवारी पत्रपरिषदेत याबाबत माहिती दिली. वसंतराव देशपांडे सभागृह, सिव्हिल लाईन्स येथे या तिसऱ्या संमेलनाचे आयोजन होणार असून, ज्येष्ठ साहित्यिक अनंत विष्णू ढोले हे संमेलनाचे अध्यक्ष आहेत. यावेळी राज्याचे सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले, राकाँपाचे प्रदेशाध्यक्ष सुहास तेंडुलकर, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचे संयोजक विजय कान्हेकर यांच्यासह शहर पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय, महापौर नंदाताई जिचकार, समाजकल्याणचे प्रादेशिक उपायुक्त डॉ. सिद्धार्थ गायकवाड, डॉ. राजू देशमुख, डॉ. उदय बोधनकर, गुणेश्वर आरीकर, शोएब असद आदी प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत. दोन दिवसीय संमेलनात परिसंवाद, कविसंमेलन, संमेलनाध्यक्षांची मुलाखत तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येईल. या संमेलनात अपंगांच्या हिताचे १९ ठराव पारित करून शासनाला सादर करण्यात येणार असल्याचे गजभिये यांनी सांगितले. संमेलनात राज्यभरातून अपंग लेखक, साहित्यिक आणि ५०० ते ७०० लोक सहभागी होणार आहेत. संमेलनाच्या माध्यमातून अंध व अपंग साहित्यिक व कलावंतांना मंच उपलब्ध करून देणे व अभिव्यक्तिकौशल्य व कला आविष्कारातून त्यांचा संघर्ष व उपलब्धी समाजापर्यंत पोहचविणे हा संमेलनाचा उद्देश असल्याचे गजभिये यांनी स्पष्ट केले.