Girl Student Stabbed to Death Nagpur: गणेशोत्सवानिमित्त नागपुरात कडेकोट सुरक्षा बंदोबस्त असताना एका दहावीतील विद्यार्थिनीची तिच्या शाळेसमोरच भोसकून हत्या करण्यात आली. अजनी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील अजनी रेल्वे कॉलनीतील सेंट अँथोनी शाळेजवळ ही घटना घडली. आरोपीदेखील अल्पवयीनच असून हत्या केल्यानंतर तो घटनास्थळावरून फरार झाला. या घटनेमुळे खळबळ उडाली असून पोलिसांकडून शोधमोहीम सुरू आहे.
अँजेल जॉन (कौशल्यायन नगर) असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे. ती सेंट अँथोनी शाळेमध्ये दहावीत शिकत होती. तर अल्पवयीन आरोपी हा रामबाग परिसरातील रहिवासी असल्याचे सांगण्यात येत आहे. शुक्रवारी दुपारी सव्वा दोन वाजताच्या सुमारास शाळा सुटली. त्यानंतर अँजेल तिच्या मैत्रिणींसोबत घरी जाण्यासाठी निघाली. शाळेतून बाहेर निघाल्यावर काही मीटर अंतरावरच अल्पवयीन आरोपी तिची प्रतीक्षा करत होता. त्याने तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याला टाळून ती पुढे जाऊ लागली. दुचाकीवरून आलेल्या आरोपीने तिला पकडले व खिशातून चाकू काढून तिच्या छातीवर वार केले. त्याने खोलवर घाव केल्याने मुलगी जोरजोरात ओरडत खाली पडली. आरोपीने तिच्यावर वार सुरूच ठेवले. त्यानंतर दुचाकी तेथेच सोडून तो अजनी रेल्वे कॉलनीतील हॉकी मैदानाच्या दिशेने पळत जात फरार झाला. या घटनेमुळे खळबळ उडाली. घटनास्थळी अनेकजण होते यामुळे पळापळ झाली. तातडीने शाळा तसेच पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचत पंचनामा सुरू केला. मात्र, हाती काहीच लागले नाही. घटनास्थळी सहपोलिस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, उपायुक्त रश्मिता राव, सहायक आयुक्त नरेंद्र हिवरे पोहोचले. अजनी पोलिस ठाण्यात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एकतर्फी प्रेमातून केली हत्याआरोपी व अँजेलची अगोदरपासून ओळखी होती. तो तिच्याच शाळेचा माजी विद्यार्थी होता. मात्र, त्याची संगत खराब असल्याने तिने त्याच्याशी मैत्री सोडली होती. मात्र, एकतर्फी प्रेमातून तो तिला सातत्याने त्रास देत होता. त्यातूनच त्याने तिची हत्या केली असावी, असा पोलिसांना संशय आहे.
चाकू-चप्पल घटनास्थळी सोडून आरोपी फरारअँजेलची हत्या केल्यानंतर अल्पवयीन आरोपी अजनी रेल्वे कॉलनीच्या आतील भागातून फरार झाला. जाताना तो चाकू व चप्पल तिथेच सोडून गेला. तसेच त्याची दुचाकीदेखील घटनास्थळीच होती. पोलिसांच्या फॉरेन्सिक पथकाकडून सविस्तर विश्लेषण सुरू आहे.