नागपूरकरही या आठवड्यात अनुभवू शकणार शून्य सावली दिवस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2021 22:08 IST2021-05-22T22:04:38+5:302021-05-22T22:08:37+5:30
zero shadow day वर्षातून दोनदा येणारा शून्य सावली दिवस खगोलातील महत्त्वाचा योग असतो. अभ्यासक आणि विद्यार्थी या दिवसाची वाट पाहत असतात. नागपूर जिल्ह्यातील जनतेलाही हा शून्य सावली दिवस या आठवड्यात अनुभवता येणार आहे.

नागपूरकरही या आठवड्यात अनुभवू शकणार शून्य सावली दिवस
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : वर्षातून दोनदा येणारा शून्य सावली दिवस खगोलातील महत्त्वाचा योग असतो. अभ्यासक आणि विद्यार्थी या दिवसाची वाट पाहत असतात. नागपूर जिल्ह्यातील जनतेलाही हा शून्य सावली दिवस या आठवड्यात अनुभवता येणार आहे.
वर्षभर सोबत राहणारी सावली या दिवशी काही मिनिटांसाठी साथ सोडून जाते, तो दिवस म्हणजे शून्य सावली दिवस असतो. सूर्याचा उत्तरायण आणि दक्षिणायण असा भासमान मार्ग पृथ्वीच्या २३.५० अंशावर दक्षिण आणि उत्तरेकडे असतो. म्हणजेच कर्कवृत्त आणि मकरवृत्त यादरम्यान असणाऱ्या सर्व भूभागावर सूर्य वर्षातून दोनदा दुपारी डोक्यावर येतो आणि दोनदा शून्य सावली दिवस येतात. उत्तरायण होताना एकदा आणि दक्षिणायण होताना एकदा. सूर्य दररोज ०.५० अंश सरकतो, म्हणजे तो एकाच अक्षवृत्तावर २ दिवस राहतो, त्यामुळे एकाच ठिकाणावरून दोन दिवस शून्य सावली अनुभवता येऊ शकते.
महाराष्ट्रात ३ मे ते ३१ मेपर्यंत शून्य सावली दिवस येतात. वेगवेगळ्या अक्षवृत्तांवर वेगळे दिवस आणि वेळा आहेत. त्यामुळे सर्व शहरे आणि गावांच्या वेळांत काही सेकंदांचा फरक आहे. म्हणून दुपारी १२ ते १२.३५ या वेळेत सूर्य निरीक्षण करावे. मोकळ्या जागी, घराच्या छतावर किंवा अंगणात निरीक्षण करता येईल.
- प्रा. सुरेश चोपणे, अध्यक्ष, स्काय वॉच ग्रुप
असे करावे निरीक्षण
शून्य सावली निरीक्षणासाठी दोन ते तीन इंच व्यासाचा, एक दोन फूट उंचीचा पोकळ प्लास्टिक पाइप किंवा कोणतीही उभी वस्तू किंवा मनुष्याने उन्हात सरळ उभे राहावे. सूर्य अगदी डोक्यावर आला की सावली दिसत नाही.
नागपुरातील शून्य सावली दिवस
२४ मे-भिवापूर(दु. १२.०८), उमरेड(१२.०९)
२५ मे-कुही (१२.०९), बुटीबोरी(१२.११), हिंगणा(१२.१२)
२६ मे-नागपूर शहर,कामठी (१२.१०), कळमेश्वर(१२.११)
२७ मे-मौदा (१२.०९), रामटेक, पारसिवणी (१२.१०), सावनेर (१२.११), काटोल (१२.१३)
२८ मे-नरखेड (१२.१३)