राहुल पेठकर
रामटेक (नागपूर) : महाकवी कालिदासांचे महाकाव्य उत्कृष्ट काव्याचा नमुना म्हटले जाते आणि जगभरात त्यांच्या काव्यावर संशोधन सुरू आहे. कालिदासांनी आयुष्यभर अनुभवलेला प्रेमविरह अनेकांच्या जास्त ओळखीचा आहे आणि त्याची तीव्रता अजरामर अशा मेघदूतमधील ‘आषाढस्य प्रथम दिवसे’ या ओळीने आणखीनच प्रखर होते. कालिदासांच्या आयुष्याचा तो विरह कधी संपणार, हा प्रश्न आहे. रामटेकमध्ये असलेल्या कालिदास स्मारकाची दुरवस्था बघून, हा प्रश्न अधिकच प्रबळ होतो.!
‘आषाढस्य प्रथम दिवसे’ म्हटले की आपल्याला आठवण येते महाकवी कालिदासांची....त्यामुळे आषाढाचा पहिला दिवस महाकवी कालिदास दिवस म्हणूनही साजरा केला जातो. कालिदासांच्या’या आठवणी जपल्या जाव्यात यासाठी येथे कालिदास स्मारक तयार करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. १० डिसेंबर १९६८ रोजी तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या उपस्थितीत या स्मारकाचे भूमिपूजन करण्यात आले होते. ३ लाख ४९ हजार रुपये खर्च करून हे स्मारक उभारले. त्याचे उद्घाटन १२ डिसेंबर १९७३ ला झाले.
या स्मारकात कालिदासांची तीन महाकाव्ये मेघदुतम्, कुमारसंभवम् आणि रघुवंशम्, तसेच तीन नाटके मालविकाग्निमित्रम्, विक्रमोर्वशीयम् आणि शाकुंतलम् यातील विविध प्रसंगांवर भारतातील विख्यात चित्रकार मधू पोवळे, मुरली लाहोटी, वासुदेव स्मार्त, शांताराम कामत, दिनेश शाह आणि वामन करंजेकर यांनी काढलेली तैलचित्रे लावली आहेत. या स्मारकाच्या दिमतीला तत्कालीन मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक व माजी मंत्री स्व. मधुकरराव किंमतकर यांच्या कल्पनेतून एक भव्य ‘ओम’ची निर्मिती करण्यात आली आहे. जयपुरी दगडात बांधलेली ही वास्तू अद्वितीय आहे. तिथे टाइल्सच्या तुकड्यांपासून कालिदासांच्या नाटकातील प्रसंग रेखाटले आहेत. यासाठी स्व. श्रीकांत जिचकार यांनी पुढाकार घेतला होता. ‘ओम’च्या आत पर्यटकांना आकर्षित करणारे संगीत कारंजे लावले आहेत. बगिचा बनविला. अतिशय सुंदर असे हे ठिकाण बनविले गेले. त्यानंतर हे नगर परिषदेकडे सुपूर्द करण्यात आले.
नगर परिषदेने ठरविले असते आणि शासनाने मदत केली असती, तर हे जागतिक कीर्तीचे पर्यटनस्थळ झाले असते; पण तसे झाले नाही. आज बगिचा उजाड झाला आहे. संगीत कारंजे बंद पडले आहेत. भित्तीचित्र नीरस झाले आहे. काही दिवसांपूर्वी तर येथे वीज पुरवठाही नव्हता. वृक्षराजी नसल्याने हा भाग ओसाड झाला आहे.
कालिदास यांच्या स्मारकाबाबत नगर परिषदेने एक ठराव घेतला आहे. देखभालीसाठी लवकरच स्मारक संस्कृत विद्यापीठाकडे हस्तांतरित केले जाईल.हर्षल गायकवाड, मुख्याधिकारी, रामटेक, नगर परिषद