नागपूर रेल्वेस्थानकावर ३३ किलो गांजा पकडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2019 23:02 IST2019-02-28T23:00:37+5:302019-02-28T23:02:03+5:30
रेल्वे सुरक्षा दलाने बुधवारी दक्षिण एक्स्प्रेसमध्ये २४.५ किलो गांजा जप्त केल्यानंतर गुरुवारी पुन्हा प्लॅटफार्म क्रमांक ३ वर बेवारस अवस्थेत असलेल्या तीन बॅगमधून ३३ किलो गांजा जप्त केला आहे.

नागपूर रेल्वेस्थानकावर ३३ किलो गांजा पकडला
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : रेल्वे सुरक्षा दलाने बुधवारी दक्षिण एक्स्प्रेसमध्ये २४.५ किलो गांजा जप्त केल्यानंतर गुरुवारी पुन्हा प्लॅटफार्म क्रमांक ३ वर बेवारस अवस्थेत असलेल्या तीन बॅगमधून ३३ किलो गांजा जप्त केला आहे.
रेल्वे सुरक्षा दलाने जप्त केलेल्या गांजाची किंमत ३.३० लाख आहे. रेल्वे सुरक्षा दलाचे वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त ज्योती कुमार सतीजा यांनी गठित केलेल्या क्राईम डिटेक्शन टीमच्या सदस्य महिला आरक्षक पुनम रेडु यांना गुरुवारी दुपारी ४ वाजता नागपूर रेल्वेस्थानकाच्या प्लॅटफार्म क्र मांक ३ वर इटारसी एण्डकडील भागात तीन बेवारस बॅग आढळल्या. त्यांनी आजूबाजूच्या प्रवाशांना विचारना केली असता बॅगवर कुणीच आपला हक्क सांगितला नाही. त्यांनी उपनिरीक्षक गौरीशंकर एडले यांना याबाबत सूचना दिली. एडले यांनी कमांडंट सतीजा यांना माहिती दिली. सतीजा यांच्या आदेशानुसार श्वानपथकाचे सहायक उपनिरीक्षक बी. एस. बघेल यांनी श्वान रेक्ससोबत घटनास्थळी येऊन बॅगची पाहणी केली. बॅगमध्ये मादक पदार्थ असल्याचा संकेत श्वान रेक्सने दिला. त्यानंतर बॅग उघडून पाहिल्या असता त्यात १६ पाकिटात ३.३० लाख किमतीचा ३३ किलो गांजा असल्याचे स्पष्ट झाले. कागदोपत्री कारवाईनंतर जप्त केलेला गांजा लोहमार्ग पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आला.