लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : प्रारूप प्रभागरचना प्रसिद्ध झाल्यानंतर त्यावर आक्षेप व सूचना नोंदविण्याची प्रक्रिया संथ सुरू आहे. सोमवारी मनपा मुख्यालयात एक तक्रार आणि लकडगंज झोनमध्ये एक तक्रार प्राप्त झाली. यात प्रभाग चारच्या सीमांवर आक्षेप घेण्यात आला.
प्रभागाच्या सीमा व लोकसंख्येचा अभ्यास करण्यात माजी नगरसेवक गुंतले आहेत. काहींनी तक्रारपत्र तयार केले आहे, तर काही तक्रार दाखल करण्याच्या तयारीत आहेत. मात्र २०१७ च्या आधारावरच प्रारूप प्रभाग तयार झाल्यामुळे मोठ्या पक्षांच्या नेत्यांकडून फारसे आक्षेप येण्याची शक्यता कमी आहे. आक्षेप व सूचना दाखल करण्याची अंतिम तारीख ४ सप्टेंबर आहे.
मनपा मुख्यालयात सोमवारी दुपारी ३ वाजता धर्मनगर भारतवाडा निवासी विद्यासागर डी. त्रिपाठी यांच्यातर्फे तक्रार दाखल करण्यात आली. यात चार सदस्यीय प्रभाग पद्धतीवर प्रश्न उपस्थित करताना त्यांनी म्हटले की, प्रभाग ४ मधून जर एका पक्षाचे चारही सदस्य निवडून आले तर जनतेच्या अडचणींसाठी गोंधळ उभा राहतो. त्यांनी आपल्या पातळीवर प्रभागाला चार भागात विभागले होते. लोक तक्रार घेऊन त्यांच्याकडे पोहोचले असता त्यांना संबंधित भाग त्यांच्या अधिकारक्षेत्रात नाही, असे सांगितले जात होते. चार सदस्यीय प्रभागात चारही प्रतिनिधींची जबाबदारी असते. जर त्यांनी योग्यरीत्या जबाबदारी पार पाडली नाही तर एक सदस्यीय वॉर्ड पद्धती करावी. यात सदस्याची जबाबदारी स्पष्ट होते.
पर्याय म्हणून, त्रिपाठी यांनी बहुसदस्यीय प्रभाग प्रणाली पूर्णपणे रद्द करून एकसदस्यीय वॉर्डप्रणाली लागू करावी किंवा किमान प्रभाग ४च्या सीमांचे पुनर्रचना करावी, अशी मागणी केली. त्यांनी सुचविले की या सीमा स्पष्ट भौतिक परिसीमांवर आधारित असाव्यात. उत्तरेस विजय नगरकडे पिवळी नदी, पूर्वेस नाग नदी व भारतवाडा, दक्षिणेस पारडी-चिखली चौक व नागपूर-हावडा रेल्वे लाइन आणि पश्चिमेस कलमना मार्केटपासून रेल्वे लाइनपर्यंत प्रभाग ४ची सीमा असावी. लकडगंज झोनमध्येदेखील याच क्षेत्रातील प्रभागाबाबत तक्रार दाखल झाल्याचे समजते.
मुख्यालयात लावले प्रभागांचे नकाशेसिव्हिल लाइन्स येथील मनपा मुख्यालयात प्रभाग १ ते ३८ पर्यंतचे नकाशे लावले आहेत. सामान्य नागरिक हे नकाशे पाहून आपल्या प्रभागाच्या सीमांबाबत व अन्य बाबींवर आक्षेप नोंदवू शकतात. सामान्य नागरिकांबरोबरच माजी नगरसेवकही इच्छित प्रभागाचा नकाशा पाहताना दिसले.
आयुक्तांकडे केलेल्या तक्रारीत त्रिपाठी यांनी विद्यमान मसुद्याच्या तांत्रिक त्रुटींवरही प्रश्न उपस्थित केले. त्यांचे म्हणणे आहे की प्रभाग ४ मध्ये पूर्व नागपूर व उत्तर नागपूर विधानसभा क्षेत्रांचे भाग जोडून प्रभाग तयार करण्यात आला आहे, ज्यामुळे लकडगंज व आसी नगर झोनमध्ये प्रशासनिक गोंधळ निर्माण होतो आहे. सीमांकन करताना मुख्य रस्ते, रेल्वे लाइन, नद्या व बाजारपेठ यांसारख्या नैसर्गिक व शहरी सीमा दुर्लक्षित केल्या गेल्या आहेत आणि २०१७ च्याच रचनेची कोणताही वैज्ञानिक बदल न करता पुनरावृत्ती करण्यात आली आहे, असा त्यांचा आरोप आहे.