नागपूर : गेल्या आठवड्यात आंतरराष्ट्रीय स्तरावरील घडामोडींचा परिणाम देशांतर्गत सराफा बाजारात दिसून आला. नागपुरात दहा ग्रॅम शुद्ध (९९.५ टक्के) सोन्याचे दर २,१०० रुपये, तर चांदीत प्रति किलो २६०० रुपयांची वाढ झाली.
अनिश्चिततेच्या वातावरणात पुढे सोने-चांदीचे दर वाढतील वा कमी होतील, यावर भाष्य करणे कठीणच आहे. दुसरीकडे भाव आणखी वाढण्याच्या शक्यतेने ग्राहकांची खरेदी वाढल्याचे सराफांनी सांगितले. सोमवार, २७ रोजी बाजारात सोने ८०,६०० आणि चांदीचे भाव ९१,४०० रुपयांवर स्थिर होते. मंगळवारी सोने ३०० रुपयांची वाढ, तर चांदीत ४०० रुपयांची घसरण झाली. २९ रोजी सोने ४०० रुपये आणि चांदीचे भाव तब्बल १,३०० रुपयांनी वाढले. गुरुवार, ३० रोजी सोने पुन्हा ३०० रुपये आणि चांदीच्या भावात १२०० रुपयांची वाढ झाली. ३१ जानेवारीला सोने पुन्हा ८०० रुपये आणि चांदी एक हजार रुपयांनी वाढली. १ फेब्रुवारीला सोन्याचे भाव ३०० रुपयांनी वाढून जीएसटीविना ८२,७०० रुपये, तर चांदीत ५०० रुपयांची घसरण होऊन भावपातळी ९४ हजारांपर्यंत कमी झाली. सराफांकडे सोने ३ टक्के जीएसटीसह ८५,१८१ रुपये आणि चांदी ९६,८२० रुपये किलो विकली जात आहे. त्यामुळे दोन्ही मौल्यवान धातू सामान्यांच्या आवाक्याबाहेर आहेत