गणेश विसर्जनासाठी नागपूर पोलिसांनी कसली कंबर : ड्रोनने ठेवणार फुटाळा तलावावर नजर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2019 21:16 IST2019-09-11T21:10:13+5:302019-09-11T21:16:25+5:30
गणेश विसर्जनादरम्यान फुटाळा तलावावरील प्रत्येक हालचालीवर नजर ठेवण्यासाठी ड्रोन कॅमेऱ्याचा वापर करण्यात येणार आहे. पोलिसांच्यावतीने चार ड्रोन कॅमेऱ्याच्या मदतीने फुटाळा तलावावर नजर ठेवण्यात येणार आहे.

गणेश विसर्जनासाठी नागपूर पोलिसांनी कसली कंबर : ड्रोनने ठेवणार फुटाळा तलावावर नजर
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : गणेश विसर्जनादरम्यान फुटाळा तलावावरील प्रत्येक हालचालीवर नजर ठेवण्यासाठी ड्रोन कॅमेऱ्याचा वापर करण्यात येणार आहे. पोलिसांच्यावतीने चार ड्रोन कॅमेऱ्याच्या मदतीने फुटाळा तलावावर नजर ठेवण्यात येणार आहे. याशिवाय फुटाळा आणि इतर महत्त्वाच्या ठिकाणी ९७ सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत, अशी माहिती अप्पर पोलीस आयुक्त शशिकांत महावरकर, उपायुक्त चिन्मय पंडित, विनिता साहू यांनी दिली.
शहरातील बहुतांश सार्वजनिक गणेश मूर्तींचे फुटाळा तलावावर विसर्जन करण्यात येणार आहे. यामुळे फुटाळा तलावाच्या सुरक्षेला प्राधान्य देण्यात आले आहे. फुटाळा तलावावर ११ सप्टेंबरला ११, १२ सप्टेबरला ४०९, १३ सप्टेबरला २४० आणि १४ सप्टेबरला ३२ गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यात येणार आहे. फुटाळा तलावाच्या कानाकोपऱ्यावर नजर ठेवण्यासाठी चार ड्रोन तैनात करण्यात आले आहेत. गरज भासल्यास त्यांचा इतर ठिकाणीही वापर करण्यात येईल.
डीजे-फटाक्यांवर होणार कारवाई
पोलीस डीजे वाजविणारे आणि फटाके फोडणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करणार आहेत. विसर्जनाच्या वेळी पारंपरिक वाद्य वाजविण्यास परवानगी देण्यात आली आहे.१२ सप्टेबरला मध्यरात्रीपर्यंत वाद्य वाजविण्यास परवानगी देण्यात आली आहे. विसर्जन स्थळावर फटाक्यांचा वापर करण्यास मनाई करण्यात आली आहे. त्याचे उल्लंघन केल्यास कठोर कारवाई होणार आहे. ध्वनिप्रदूषण कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांची तपासणी करण्यासाठी सर्व ठाण्यांना उपकरणे देण्यात आली आहेत.
मद्यपी चालकांवर नजर
पोलिसांच्यावतीने मद्य प्राशन करून वाहन चालविणाऱ्यांविरुद्ध ड्रंक अॅन्ड ड्राईव्हची कारवाई करण्यात येणार आहे. त्यासाठी पोलिसांनी विशेष दल तैनात केले आहेत. गुरुवारी ड्राय डे आहे. विसर्जनाच्या मिरवणुकीत वाहनचालक नशेत असल्यामुळे अनेकदा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे मद्य प्राशन करून वाहन चालविणाऱ्यांवर विशेष लक्ष देण्यात येणार आहे. शहरात कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी २१७ गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींविरुद्ध प्रतिबंधक कारवाई करण्यात आली आहे.