नागपुरात पोलीस अधिकाऱ्यानेच रचले रोकड लुटण्याचे षडयंत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2018 12:52 AM2018-05-04T00:52:39+5:302018-05-04T00:52:53+5:30

नंदनवन पोलीस ठाण्याचा सहायक पोलीस निरीक्षक (एपीआय) सुनील सोनवणे याच्या सुपीक डोक्यातूनच हवालाचे अडीच कोटी लुटण्याचे कटकारस्थान प्रत्यक्षात आले. ही रोकड लुटून पळून गेलेला कुख्यात गुन्हेगार सचिन पडगिलवार, रवी माचलेकर, पिंटू वासनिक आणि गजानन मुनमुने यांनी गुन्हे शाखेत या खळबळजनक हवालाकांडाची कबुली देताना गुरुवारी इत्थंभूत माहिती दिल्याचे समजते.

In Nagpur, the police officer has created a conspiracy to rob the cash | नागपुरात पोलीस अधिकाऱ्यानेच रचले रोकड लुटण्याचे षडयंत्र

नागपुरात पोलीस अधिकाऱ्यानेच रचले रोकड लुटण्याचे षडयंत्र

Next
ठळक मुद्देगुन्हेगारांची कबुली : पोलीस दलात खळबळ : गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नंदनवन पोलीस ठाण्याचा सहायक पोलीस निरीक्षक (एपीआय) सुनील सोनवणे याच्या सुपीक डोक्यातूनच हवालाचे अडीच कोटी लुटण्याचे कटकारस्थान प्रत्यक्षात आले. ही रोकड लुटून पळून गेलेला कुख्यात गुन्हेगार सचिन पडगिलवार, रवी माचलेकर, पिंटू वासनिक आणि गजानन मुनमुने यांनी गुन्हे शाखेत या खळबळजनक हवालाकांडाची कबुली देताना गुरुवारी इत्थंभूत माहिती दिल्याचे समजते. त्यामुळे एपीआय सोनवणे, त्याच्या मर्जीतील पोलीस शिपायी सचिन भजबुजे, वाडेकर आणि अन्य एकाला या गुन्ह्यात अटक होणार आहे. दुसरीकडे पोलीस उपनिरीक्षक कृष्णा सोनुळे यांचीही भूमिका तपासली जात आहे. सोनुळे वगळता अन्य आरोपींवर रात्रीपर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
नंदनवन पोलिसांनी रविवारी पहाटे २.३० च्या सुमारास पारडी मार्गावरील प्रजापती चौकाजवळ एमएच ३१/ एफए ४६११ क्रमांकाच्या डस्टर कारमधून ३ कोटी, १८ लाखांची रोकड जप्त केली होती. रायपूरहून (छत्तीसगड) मधील मॅपल ज्वेलर्सचे संचालक खजान ठक्कर यांनी ही रोकड नागपुरातील हवाला व्यावसायिक प्रशांत केसानी याच्याकडे पोहचवण्यासाठी पाठवली होती, अशी प्राथमिक माहिती कारचालक राजेश वामनराव मेंढे (वय ४०, रा. मिनिमातानगर, कळमना) आणि नवनीत गुलाबचंद जैन (वय २९ रा. शांतिनगर, तुलसीनगर जैन मंदिराजवळ) या दोघांनी दिली होती. ही कार नंदनवन ठाण्यात आणल्यानंतर पोलिसांनी प्रशांत केसानीला फोन लावून नंदनवन पोलीस ठाण्यात येण्यास सांगितले होते. मात्र, केसानीने ठाण्यात येण्याचे आणि बोलण्याचेही टाळले. त्यानंतर रविवारी सकाळी पोलीस ठाण्यात आलेल्या मनीष खंडेलवालने कारमध्ये बनविलेल्या लॉकरची चावी उपलब्ध करून देऊन कारमध्ये ५ कोटी ७३ लाख रुपये असल्याचे म्हटले होते. प्रत्यक्षात पोलिसांनी ही रोकड मोजली तेव्हा ती केवळ ३ कोटी १८ लाखच भरली. कारमधील २ कोटी ५५ लाख रुपये लंपास करण्यात आल्याचा आरोप मनीषने केला होता. त्याची दखल घेत डीसीपी नीलेश भरणे यांनी एकीकडे आरोपी सचिन, रवी आणि त्यांच्या साथीदारांचा शोध घेणे सुरू केले, तर, दुसरीकडे एपीआय सोनवणेची भूमिका तपासणे सुरू केले.
हवाला कारची टीप देणारा कुख्यात गुन्हेगार सचिन आणि त्याचा साथीदार रवी या दोघांनी ही रोकड पळविल्याचे सांगून स्वत: निर्दोष असल्याचा कांगावा केला. पोलिसांनी या प्रकरणातील वास्तव तपासण्यासाठी सोमवारी एपीआय सोनवणे, पीएसआय सोनुळे आणि या कारवाईत सहभागी असलेल्या पोलीस कर्मचाºयांकडून हवालाकांडाचे प्रॅक्टीकल (कसा झाला घटनाक्रम) करवून घेतले. या घटनाक्रमातूनही सोनवणे आणि त्याच्या मर्जीतील शिपायांची संशयास्पद भूमिका पुढे आली.
दरम्यान, आरोपी सचिन, रवी, पिंटू आणि गजानन हे चौघे महाबळेश्वरमध्ये दडून बसल्याची माहिती कळताच डीसीपी भरणे यांनी साताºयाचे पोलीस अधीक्षक पाटील यांना ही माहिती देऊन त्यांच्याकडून आरोपींना जेरबंद करवून घेतले. त्यांना नागपुरात आणल्यानंतर गुन्हे शाखेचे उपायुक्त संभाजी कदम यांनी त्यांची चौकशी केली. या चौकशीत आरोपींनी हवाला रोकड लुटण्याचे कारस्थान एपीआय सोनवणेच्या डोक्यातून निघाल्याचे सांगितले. त्यामुळे एपीआय सोनवणे, शिपाई भजबुजे, वाडेकर आणि अन्य एकाला ताब्यात घेऊन त्यांची चौकशी सुरू करण्यात आली. या घडामोडींसोबतच आज दुपारी अली नामक व्यक्तीने डस्टर कारमधून अडीच कोटी लुटले गेल्याची रीतसर तक्रार वरिष्ठांकडे नोंदवली. त्यावरून नंदनवन ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली. या हवालाकांडात कुख्यात गुन्हेगारांसोबत नंदनवन पोलीस ठाण्यातील अधिकारी, कर्मचारीही सहभागी असल्याने संपूर्ण पोलीस दलाच्या तोंडाला काळे फासल्यासारखे झाले आहे. त्यामुळे कोणताही पोलीस अधिकारी या प्रकरणाची माहिती देण्याचे टाळत आहे.
रोकड कुठे लपविली ?
रोकड लुटण्याचे कारस्थान आधीच शिजल्यामुळे आरोपी सचिन पडगिलवारने एक अर्टिगा कार आणली होती. डस्टरमधून काढलेली अडीच कोटींची रक्कम अर्टिगामध्ये ठेवण्यात आली. त्यानंतर एपीआय सोनवणे याने ही रोकड कुठे कुठे लपवायची, त्याचे आधीच नियोजन करून ठेवले होते. त्यानुसार, चंद्रपूरसह वेगवेगळ्या ठिकाणी ही रोकड लपवून ठेवण्यात आली. ती जप्त करण्यासाठी पोलिसांची पथके वेगवेगळ्या शहरात रवाना करण्यात आली आहे.
तपास दुसरीकडे सोपविणार
या प्रकरणाने केवळ नंदनवन पोलीस ठाण्यातीलच नव्हे तर अनेक पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांभोवती संशयाचे वलय निर्माण केले आहे. त्यामुळे नंदनवन पोलीस ठाण्यातून हवालाकांडाचा तपास दुसऱ्या पोलीस ठाण्यात किंवा गुन्हेशाखेत हस्तांतरीत केला जाऊ शकतो.

 

 

Web Title: In Nagpur, the police officer has created a conspiracy to rob the cash

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.