Nagpur: भरडधान्याने दूर हाेतील आधुनिक जीवनशैलीचे सर्व आजार, पद्मश्री खादर वल्ली यांचा दावा
By निशांत वानखेडे | Updated: November 20, 2023 19:23 IST2023-11-20T19:22:37+5:302023-11-20T19:23:01+5:30
Nagpur: सध्या उपलब्ध असलेल्या भरडधान्य (मिलेट्स) मध्ये सर्व प्रकारचे प्रथिने आणि शरीरातील शर्करा नियंत्रित करण्याची क्षमता आहे.

Nagpur: भरडधान्याने दूर हाेतील आधुनिक जीवनशैलीचे सर्व आजार, पद्मश्री खादर वल्ली यांचा दावा
- निशांत वानखेडे
नागपूर : सध्या उपलब्ध असलेल्या भरडधान्य (मिलेट्स) मध्ये सर्व प्रकारचे प्रथिने आणि शरीरातील शर्करा नियंत्रित करण्याची क्षमता आहे. आहारात यांचे सेवन वाढले तर कार्पाेरेट अन्न व आधुनिक जीवनशैलीमुळे आलेले सर्व आजार दूर करून देशाला राेगमुक्त करण्याची क्षमता आहे, असा विश्वास ‘मिलेट मॅन’ पद्मश्री डाॅ. खादर वल्ली यांनी केला.
नागपूर प्रेस क्लबतर्फे आयाेजित औपचारिक चर्चेत डाॅ. वल्ली यांनी हरितक्रांतीमुळे देशाच्या अन्नसाखळीचे नुकसान झाल्याची टीका केली. भारत भरडधान्याच्या उपलब्धतेमुळे अन्नाच्या गरजेत स्वयंपूर्ण हाेता. मात्र हरित क्रांतीच्या नावाने भात, गहु, साखर, मांस, दूध हे व्यावसायिक अन्नधान्य जेवणाच्या ताटात आले आणि समस्या वाढली. हे अन्न मधुमेह, रक्तदाब, थायराॅईड व इतर सर्व दुर्धर आजारांचे कारण आहे. या व्यावसायिक अन्नामध्ये शर्कराचे प्रचंड प्रमाण असते. आज भारत मधुमेहाची राजधानी झाला व ८-१० वर्षाच्या मुलांना देखील या आजाराने ग्रासले, हे त्याचेच कारण हाेय.
ज्वारी, बाजरी, नाचनी, मका व चना हे माेठे भरडधान्य तर काेदाे, कुटकी, कंगनी, हिरवी कंगनी, साव ही लहान धान्य सध्या उपलब्ध आहेत. या धान्याचे माेठ्या प्रमाणात उत्पादन दक्षिण भारतात सुरू झाले आहे. भरडधान्यात शर्करा नियंत्रित करण्याची क्षमता आहे. शिवाय हे चयापचय व अनुवांशिक असंतुलनही दूर करू शकते. आहारात भरडधान्याचे सेवन वाढले तर व्यक्ती सहा महिन्यात आजारमुक्त हाेईल व याबाबत यशस्वी प्रयाेग केल्याची माहिती डाॅ. वल्ली यांनी दिली. भारतीयांच्या ताटात भरडधान्यांचा समावेश करणे हे आयुष्याचे ध्येय असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
कार्पाेरेट लाॅबीचे मायाजाळ
आपल्यात ताटात गहु, भात, साखर येणे ही नैसर्गिक गाेष्ट नाही तर कार्पाेरेट लाॅबीचे मायाजाळ आहे, अशी टीका डाॅ. वल्ली यांनी केली. यामागे कार्पाेरेट धान्याचे पेटंट करणारेच नाही तर खत कंपन्या, किटनाशक कंपन्या आणि वैद्यकीय व औषधी कंपन्यांची लाॅबी कार्यरत असल्याचा आराेप त्यांनी केला.
लाखाे रुपयांची सबसिडी
हे कार्पाेरेट अन्न आपल्या ताटात स्वस्तात येते असे आपल्याला दाखविले जात असले तरी यामागे सबसिडीच्या रुपाने सरकारचे लाखाे रुपये जातात. दरचर्षी २.४ लाख काेटी रुपये या धान्यावरील सबसिडीवर जात असल्याचा दावा करीत यातील १०-२० टक्के सबसिडी भरडधान्याला मिळाली तर क्रांती घडेल, असेही ते म्हणाले.
किचनच गायब हाेत आहे
आतातर बहुतेक घरांमधले किचन गायब हाेत आहे. झाेमॅटाेसारख्या कंपन्याद्वारे बाहेरून अन्न मागविण्याचे फॅड वाढले आहे, जे अतिशय धाेकादायक असल्याचे डाॅ. वल्ली म्हणाले.