नागपूर मनपाला सांडपाण्यापासून मिळणार ३३ कोटी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2018 23:50 IST2018-01-25T23:48:30+5:302018-01-25T23:50:35+5:30
नागपूर महापालिका, महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी लिमिटेड (महाजेनको ) आणि खासगी आॅपरेटर यांच्यात त्रिपक्षीय करार करण्यात आला होता. त्यानुसार दररोज १५० एमएलडी व ५० एमएलडीचे प्रकल्प सुरू होत आहे. यातून महापालिकेच्या तिजोरीत वर्षाला ३३ कोटींचा महसूल जमा होणार आहे.

नागपूर मनपाला सांडपाण्यापासून मिळणार ३३ कोटी
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूर महापालिका, महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी लिमिटेड (महाजेनको ) आणि खासगी आॅपरेटर यांच्यात त्रिपक्षीय करार करण्यात आला होता. त्यानुसार दररोज १५० एमएलडी व ५० एमएलडीचे प्रकल्प सुरू होत आहे. यातून महापालिकेच्या तिजोरीत वर्षाला ३३ कोटींचा महसूल जमा होणार आहे.
सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पातून महाजेनकोच्या मौदा व खापरखेडा येथील वीज प्रकल्पांना पाणीपुरवठा केला जाणार आहे. विशेष म्हणजे भांडेवाडी येथील महापालिकेच्या १३० एमएलडी क्षमतेचा सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पातून कोराडी येथील वीज निर्मिती प्रकल्पाला पुरविल्या जाते . यातून महापलिकेला वर्षाला १५ कोटी मिळतात. सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पांच्या माध्यमातुन महापालिकेच्या तिजोरीत ४५ ते ५० कोटी जमा होणार असल्याची माहिती आयुक्त अश्विन मुदगल यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली.
कोराडी, खापरखेडा व मौदा येथील वीज निर्मिती प्रकल्पासाठी मोठ्या प्रमाणात धरणातील पाण्याचा वापर केला जातो. याचा सिंचनवर परिणाम होतो. परंतु आता वाया जाणाऱ्या सांडपाण्यावर प्रक्रिया करून ते प्रकल्पासाठी वापरण्यात येणार आहे. यातून पिण्याच्या व सिंचनाच्या पाण्याची मोठ्या प्रमाणात बचत होणार आहे. दुसरीकडे महापालिकेलाही या प्रकल्पाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात महसूल मिळणार आहे. नागपूर शहराला पाणीपुरवठा होणाऱ्या पेंच प्रकल्पातून वीज प्रकल्पांनाही पाणीपुरवठा केला जातो. मात्र आता वाया जाणाऱ्या सांडपाण्याचा यासाठी वापर केला जाणार असल्याने पाण्याच्या बचतीसोबतच खर्चातही मोठ्या प्रमाणात बचत होणार असल्याचा विश्वास मुदगल यांनी व्यक्त केला.
दूषित पाण्याची समस्या मार्गी
शहरातील सांडपाणी नागनदीत सोडले जाते. पुढे ते गोसेखुर्द प्रकल्पाला जाऊन मिळते. यामुळे नदीकाठावरील गावांतील भूगर्भातील पाणी दूषित झाले आहे. गोसीखुर्द प्रकल्पाचे पाणी दूषित होत आहे. याचा नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याचा धोका आहे. परंतु आता ३३० एमएलडी सांडपाण्यावर प्रक्रिया होणार असल्याने दूषित पाण्याची समस्या मोठ्या प्रमाणात मार्गी लागणार आहे.