अर्थसंकल्पात नागपूरला हव्यात नव्या रेल्वेगाड्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:54 IST2021-02-05T04:54:35+5:302021-02-05T04:54:35+5:30
नागपूर : केंद्रीय अर्थसंकल्पात रेल्वेबाबत काय घोषणा होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. रेल्वेतील जाणकारांनी अर्थसंकल्पात नागपूरला नव्या रेल्वेगाड्या ...

अर्थसंकल्पात नागपूरला हव्यात नव्या रेल्वेगाड्या
नागपूर : केंद्रीय अर्थसंकल्पात रेल्वेबाबत काय घोषणा होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. रेल्वेतील जाणकारांनी अर्थसंकल्पात नागपूरला नव्या रेल्वेगाड्या मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे. तसेच रेल्वेस्थानक आणि रेल्वेमार्गांच्या विकासावर भर देण्यात येईल, असे मत त्यांनी व्यक्त केले आहे.
सब स्टेशनचा विकास व्हावा
अर्थसंकल्पात कळमना, गोधणी, बुटीबोरी, कामठी या सब स्टेशनचा विकास करण्याबाबतची घोषणा अपेक्षित आहे. नागपूर जवळील छोट्या शहरांसाठी ब्रॉडगेज मेट्रो रेल्वे चालविण्याच्या प्रकल्पास गती मिळण्याची अपेक्षा आहे. नागपूरवरून दिल्ली, मुंबई, हावडा मार्गावर नव्या गाड्या सुरू करण्याची घोषणा व्हायला हवी. मागील अर्थसंकल्पात रेल्वे मेडिकल कॉलेज, रेल्वे परिसरात सोलर पॅनलच्या घोषणेची अंमलबजावणी झाली नाही.
- प्रवीण डबली, माजी झेडआरयुसीसी सदस्य, दपूम रेल्वे
रायबरेली, हावडासाठी गाड्या सुरू कराव्यात
अर्थसंकल्पात नागपूर ते रायबरेलीसाठी नवी गाडी सुरू होण्याची अपेक्षा आहे. असे शक्य न झाल्यास भोपाळ-रायबरेली गाडीचा नागपूरपर्यंत विस्तार करावा. नागपूरपासून गोव्यासाठी थेट रेल्वेगाडी तसेच नागपूर-अलाहाबाद गाडीची घोषणा होण्याची अपेक्षा आहे. स्पेशल रेल्वेगाड्यांऐवजी नियमित रेल्वेगाड्या चालविण्याची गरज आहे.
- बसंत कुमार शुक्ला, महासचिव, भारतीय यात्री केंद्र
नागपूर-छिंदवाडा ब्रॉडगेज लाइन सुरू व्हावी
‘मागील अर्थसंकल्पात इतवारीला टर्मिनस बनविण्याची घोषणा केली होती. नागपूर-छिंदवाडा ब्रॉडगेज लवकरच सुरू होईल, असे सांगण्यात आले होते. परंतु त्याची अंमलबजावणी झाली नाही. या अर्थसंकल्पात त्यावर विचार व्हावा. नागपूरला वर्ल्ड क्लास स्टेशन बनविण्यासाठी अर्थसंकल्पात तरतूद होण्याची गरज आहे. नागपूरवरून दिल्ली, हावडासाठी थेट रेल्वेगाड्यांची अपेक्षा आहे.
- प्रताप मोटवानी, झेडआरयुसीसी सदस्य, दपूम रेल्वे
इतवारी-रिवा गाडी प्रयागराजपर्यंत चालवावी‘इतवारी-रिवा ही गाडी अलाहाबाद, प्रयागराजपर्यंत चालविण्यासाठी निर्णय घेण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे रेल्वेचा महसूल वाढून प्रवाशांची सुविधा होईल. तसेच शिवनाथ एक्स्प्रेस इतवारीऐवजी नागपूर किंवा अजनी रेल्वेस्थानकावरून सुरू केल्यास अधिक प्रवाशांना त्याचा लाभ होईल.
- सतीश यादव, झेडआरयुसीसी सदस्य, मध्य रेल्वे
.............