नागपुरातील नगरसेवक बंटी शेळके यांचे सदस्यत्व धोक्यात?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2018 00:06 IST2018-08-30T00:05:23+5:302018-08-30T00:06:18+5:30
महापालिका सभागृहात गोंधळ घालून कामकाजात अडथळा निर्माण केल्याच्या कारणावरून काँग्रेसचे नगरसेवक बंटी शेळके यांच्यावर कठोर कारवाई होण्याची शक्यता आहे. सूत्रांच्या माहितीनुसार शेळके यांचे सदस्यत्व रद्द करण्याचा प्रस्ताव आगामी ५ सप्टेंबरच्या सर्वसाधारण सभेत आणण्याची शक्यता आहे.

नागपुरातील नगरसेवक बंटी शेळके यांचे सदस्यत्व धोक्यात?
लोकमत न्यूज नेवटर्क
नागपूर : महापालिका सभागृहात गोंधळ घालून कामकाजात अडथळा निर्माण केल्याच्या कारणावरून काँग्रेसचे नगरसेवक बंटी शेळके यांच्यावर कठोर कारवाई होण्याची शक्यता आहे. सूत्रांच्या माहितीनुसार शेळके यांचे सदस्यत्व रद्द करण्याचा प्रस्ताव आगामी ५ सप्टेंबरच्या सर्वसाधारण सभेत आणण्याची शक्यता आहे.
३ फे ब्रुवारी २०१८ रोजी महापालिकेची सर्वसाधारण सभा सुरू असताना सभागृहाबाहेर आशा कार्यकर्त्यांची निदर्शने सुरू होती. आंदोलकांना बंटी शेळके यांनी सभागृहात घुसवले होते. त्यामुळे सभागृहाचे कामकाज स्थगित करावे लागले होते. यासंदर्भात आशा कार्यक र्त्यांनी लेखी तक्रार केली होती. महापालिका आयुक्तांच्या निर्देशानुसार या संदर्भात पोलीस स्टेशनला तक्रार करण्यात आली होती. त्यानंतर आयुक्तांनी शेळके यांना नोटीस बजावून स्पष्टीकरण मागितले होते. परंतु शेळके यांच्या दिलेल्या स्पष्टीकरणामुळे प्रशासनाचे समाधान झालेले नाही. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी तत्कालीन अपर आयुक्त रिजवान सिद्दीकी यांच्याकडे सोपविण्यात आली होती. सिद्दीकी यांच्या चौकशीत शेळके दोषी आढळून आले आहेत. कायदेतज्ज्ञांचा सल्ला व महापालिका कायद्याचा अभ्यास केल्यानंतर शेळके यांच्यावर कारवाई करण्याबाबतचा प्रस्ताव सभागृहात ठेवला जाणार आहे.
शेळके यांच्यावर कारवाई व्हावी यासाठी सत्तापक्षातील काही सदसय आग्रही आहेत. या प्रकरणापूर्वी शेळके यांनी सभागृहात घंटा वाजवून सभागृहाच्या कामकाजात बाधा निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता. तसेच शासकीय कामकाजात अडथळा आणणे, शासकीय मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी शेळके यांच्या विरोधात पोलीस स्टेशनला अनेक तक्रारी दाखल आहेत.
तीन मुले असल्याचा माजी नगरसेवक बंडू तळवेकर, इफ्तेखार अशरफू निशा यांचे सदस्यत्व रद्द करण्याबाबतचा प्रस्ताव शासनाकडे प्रलंबित आहे. तसेच जात पडताळणी प्रमाणपत्र सादर न केल्याने अनेक नगरसेवकांचे सदस्यत्व रद्द झालेले आहे. परंतु कामकाजात अडथळा निर्माण करण्यावरुन मागील काही वर्षात नगरसेवकांवर कारवाई झालेली नाही.
सभागृहाला कायदेशीर कारवाईचे अधिकार
महापालिका कायद्याच्या कलम-१३ अंतर्गत नगरसेवक बंटी शेळके यांचे सदस्यत्व रद्द करण्याबाबतचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. सभागृहाचा एखादा सदस्य गैरवर्तन करून सभागृहाच्या कामकाजात अडथळा निर्माण करीत असेल तर कायद्यानुसार त्याचे सदस्यत्व रद्द करण्याबाबतचा प्रस्ताव पारित करण्याचा अधिकार सभागृहाला आहे. हा प्रस्ताव मंजुरीसाठी राज्य सरकारकडे पाठविला जाईल. यावर राज्य सरकारला निर्णय घ्यावयाचा आहे.
भाजपात दोन मतप्रवाह
सूत्रांच्या माहितीनुसार बंटी शेळके यांच्यावर कारवाई करण्यासंदर्भात भाजपात दोन मतप्रवाह आहेत. शेळके यांच्यावर कारवाई केली तर पक्षाची प्रतिमा मलीन होईल. त्यामुळे कठोर कारवाई नको, अशी काही नगरसेवकांची भूमिका आहे. तर भाजपाचे काही नगरसेवक शेळके यांच्यावर कारवाई व्हावी, यासाठी आग्रही आहेत.