'मराठीच्या पुस्तकातील गुजरातीचा शिरकाव सहन केला जाणार नाही'
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2018 15:20 IST2018-07-13T14:57:35+5:302018-07-13T15:20:42+5:30
मराठीला अभिजात दर्जा देण्याची भाषा करणा-या भाजप सरकारच्या काळात मराठी पाठ्यपुस्तकात गुजराती भाषेत दोन पाने लिहिलेली आढळली आहेत.

'मराठीच्या पुस्तकातील गुजरातीचा शिरकाव सहन केला जाणार नाही'
नागपूर: राज्यात मराठी शाळांमधील सहाव्या इयत्तेच्या भूगोल या विषयाच्या पाठ्यपुस्तकात दोन पाने गुजराती भाषेतील दिल्याचे आढळल्याने मराठीत गुजरातीचा शिरकाव झाला काय, असा प्रश्न काँग्रेसचे आमदार भाई जगताप यांनी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना केला आहे.
मराठीला अभिजात दर्जा देण्याची भाषा करणा-या भाजप सरकारच्या काळात मराठी पाठ्यपुस्तकात गुजराती भाषेत दोन पाने लिहिलेली आढळली आहेत. याचा आम्ही निषेध करतो. महाराष्ट्राने आपला अभिमान गुजरातकडे गहाण ठेवला का असा रोखठोक सवाल त्यांनी यावेळी विचारला. जोपर्यंत सरकार याबाबत खुलासा करत नाही तोपर्यंत विधान परिषदेचे सभागृह चालू देणार नाही असा इशाराही त्यांनी दिला. हा प्रश्न आमदार सुनील तटकरे यांनी उपस्थित केल्यानंतर शिवसेनेचा एकही सदस्य यावर बोलला नाही.
विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, सुनील तटकरे यांनी प्रसिद्धीमाध्यमांसमोर सहाव्या वर्गातील पुस्तकात आढळलेल्या गुजराती भाषिक मजकुराबद्दल तीव्र निषेध केला. सरकारला महाराष्ट्राचा गुजरात करायचा आहे का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
आम्ही भूगोलाच्या पुस्तकात गुजराती छापून आणले हा चंद्रकांत पाटील यांचा आरोप दुर्दैवी . मी राजकारणासाठी राजकारण करत नाही . जर मी खोटा असल्याचे सिद्ध केले तर विष घेऊन आत्महत्या करेन असे सुनील तटकरे म्हणाले.