Nagpur: भारत बंदला नागपुरात संमिश्र प्रतिसाद, शहरात ठिकठिकाणी आंदोलन
By आनंद डेकाटे | Updated: August 21, 2024 15:10 IST2024-08-21T15:09:57+5:302024-08-21T15:10:12+5:30
Bharat Bandh in Nagpur: अनुसूचित जाती व अनुसूचित जमातींच्या आरक्षणामध्ये उपवर्गीकरण आणि क्रिमिलेअर लावण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाविरोधात बुधवारी भारत बंदचे आवाहन करण्यात आले. नागपुरात या बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला. शहरात ठिकठिकाणी आंदोलन करण्यात आले.

Nagpur: भारत बंदला नागपुरात संमिश्र प्रतिसाद, शहरात ठिकठिकाणी आंदोलन
- आनंद डेकाटे
नागपूर - अनुसूचित जाती व अनुसूचित जमातींच्या आरक्षणामध्ये उपवर्गीकरण आणि क्रिमिलेअर लावण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाविरोधात बुधवारी भारत बंदचे आवाहन करण्यात आले. नागपुरात या बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला. शहरात ठिकठिकाणी आंदोलन करण्यात आले. बसपा, बीआरएसपी, रिपाइं, पीरिपासह विविध राजकीय पक्ष आणि विविध सामाजिक संघटना या बंदच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरल्या होत्या.
आरक्षण उपवर्गीकरणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचा १ तारखेला निर्णय येताच याविरोधात देशभरात असंतोष पसरला होता. त्यानुसार काही सामाजिक संघटनांनी भारत बंदचे आवाहन केले होते. बुधवारी शहरात सकाळपासूनच इंदोरा चौक,कमाल चौक, त्रिशरण चौक, संविधान चौकासह विविध ठिकाणी आंदोलन करण्यात आले. त्यानंतर शहराच्या विविध भागातील संघटनांनी रॅली काढली. संविधान चौकात या रॅलीचे जाहीर सभेत रूपांत झाले. संविधान चौकात मोठ्या प्रमाणावर लोक एकत्र आले. त्यामुळे वाहतूक व्यवस्थाही ठप्प झाली होती.
इंदोरा चौक, दीक्षाभूमी, संविधान चौकात मोठा बंदोबस्त
बंदच्या पार्श्वभूमीवर शहरात सर्वच ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त होता. परंतु इंदोरा, चौक, कमाल चौक, दीक्षाभूमी आणि दीक्षाभूमी येथे अधिकचा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
साहित्यिक-विचारवंतांचेही बंदला समर्थन
या भारत बंदला साहित्यिक व विचारवंतांनी आपले समर्थन जाहीर केले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे एससी आणि एसटी या दोन्ही सामाजिक-राजकीय शक्तींचे आरक्षण संपविले जाईल. त्यांची एकीकरणाची अभिप्रेत प्रक्रियाही संपिवली जाईल. त्यांच्या सामाजिक व राजकीय भवितव्याचे पंख छाटले जातील, हे होऊ नये म्हणून या निकालाविरुद्ध होणाऱ्या या बंदला आम्ही जाहीर समर्थन देत असल्याचे ज्येष्ठ साहित्यिक डॉ. यशवंत मनोहर, लक्ष्मण माने, रावसाहेब कसबे, नागेश चौधरी, रूपाताई कुळकर्णी, सूर्यनारायण रणसुभ, उत्तम कांबळे, रवींद्र इंगळे, गौतमीपूत्र कांबळे, प्रभू राजगडकरउत्तम जहागीरदार यांनी म्हटले आहे.