नागपुरातील मोमिनपुरा परिसर कावीळ, गॅस्ट्रोच्या विळख्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2018 07:50 PM2018-05-21T19:50:42+5:302018-05-21T20:46:30+5:30

मोमिनपुरा परिसरात गेल्या काही दिवसांपासून दूषित पाणी पुरवठा होत असल्याने या भागात मोठ्या संख्येत कावीळ व गॅस्ट्रोचे रुग्ण दिसून येऊ लागले आहेत. तकिया, नालसाहब चौक, कसाबपुरा या परिसरात ४२वर लोकांना कावीळची लागण झाली आहे.

Nagpur Maminpura area people suffered from jaundice,gastro | नागपुरातील मोमिनपुरा परिसर कावीळ, गॅस्ट्रोच्या विळख्यात

नागपुरातील मोमिनपुरा परिसर कावीळ, गॅस्ट्रोच्या विळख्यात

Next
ठळक मुद्देदूषित पाण्याचा पुरवठा : ४२ वर लोकांना कावीळ : नागरिकांचे आरोग्य धोक्यात

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : मोमिनपुरा परिसरात गेल्या काही दिवसांपासून दूषित पाणी पुरवठा होत असल्याने या भागात मोठ्या संख्येत कावीळ व गॅस्ट्रोचे रुग्ण दिसून येऊ लागले आहेत. तकिया, नालसाहब चौक, कसाबपुरा या परिसरात ४२वर लोकांना कावीळची लागण झाली आहे. प्रशासनाला याविषयी तक्रार करूनही लक्ष देत नसल्याचा येथील सामाजिक कार्यकर्त्यांचा आरोप आहे. विशेषत: या भागात ‘लोकमत’ चमू गेली असताना लोकांनी दूषित पाणी दाखवत ‘ओसीडब्ल्यू’ मुर्दाबादचे फलक हाती घेऊन निषेध व्यक्त केला.
महानगरपालिकेच्या झोन क्र. ६ महाल अंतर्गत येणाऱ्या विशेषत: मेयो हॉस्पिटललगत असलेल्या कसाबपुरा, तकिया, नालसाहब चौक परिसरात गेल्या १५-२० दिवसांपासून दूषित पाणीपुरवठा होत आहे. सुरुवातीला येणारे पाणी लाल-पिवळसर व दुर्गंधीयुक्त असल्याचे येथील नागरिकांचे म्हणणे आहे. यामुळे काही वेळ पाणी जाऊ दिल्यानंतर या पाण्याचा वापर पिण्यासाठी होतो. परंतु हे पाणी किती शुद्ध ही शंका आहे. दूषित पाण्यामुळे घराघरात कावीळ, गॅस्ट्रोचे रुग्ण आहेत. काही शासकीय तर काही खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. काही दिवसांपूर्वी दोन रुग्णांचा मृत्यूही झाल्याचे येथील नागरिक सांगतात. या समस्येला घेऊन येथील नागरिकांनी ‘आॅरेंज सिटी वॉटर वर्क्स’ला (ओसीडब्ल्यू) तक्रारी दाखल केल्या आहेत. सोमवारी ‘लोकमत’ चमूने या भागाला भेट दिली असता पाण्याची बिकट समस्या असताना, दूषित पाण्यामुळे येथील नागरिक हवालदिल झाल्याचे दिसून आले.
-महापौरांना पाजणार पाणी
युवक काँग्रेसचे वरिष्ठ महासचिव फजलूर्रहमान कुरेशी म्हणाले, या भागात कमी दाबाचा पाणीपुरवठा होत असल्याने पाणी समस्या बाराही महिने असते. यातच गेल्या महिन्यापासून दूषित पाण्याच्या समस्येत वाढ झाली आहे. दूषित पाण्यामुळे कावीळ, गॅस्ट्रोच्या रुग्णांत वाढ झाली आहे. विशेषत: लहान मुले याला बळी पडत असल्याने पालकांमध्ये रोष आहे. या समस्येला घेऊन ‘ओसीडब्ल्यू’ला तक्रारी केल्या आहेत, परंतु उपाययोजना नाही. यामुळे या भागात नळाला येणारे पाणी आम्ही आता महापौरांना पाजण्याचे आंदोलन हाती घेऊ, असा इशाराही त्यांनी दिला.

शुद्ध पाण्याची जबाबदारी मनपाची
मोहम्मद रिजवान म्हणाले, तकिया परिसरात पाण्याची भीषण टंचाई आहे. यातच सुरुवातीला येणारे पाणी हे दुर्गंधीयुक्त असते. त्या स्थितीतही लोक पाणी भरतात. या पाण्यामुळे कावीळ, गॅस्ट्रोच्या रुग्णांत वाढ झाली आहे. शुद्ध पाण्याची जबाबदारी महानगरपालिकेची आहे. परंतु तक्रारी करूनही त्याचे निराकरण होत नसल्याने सामान्य नागरिकांनी कुणाकडे दादा मागावी हा प्रश्न आहे.

 लोक मेल्यावरच प्रशासन लक्ष देईल
हैदरी रोड येथील हाजी तसलीम व मोमिनपुरा येथील मो. शाहीद रंगुनवाला म्हणाले, दूषित पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले, परंतु मनपाकडून याची दखलही घेतली जात नाही. उपाययोजना म्हणून टँकरमधून पाणीपुरवठाही केला जात नाही. लोक मेल्यावरच प्रशासन लक्ष देईल का, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

९५ टक्के रुग्ण कावीळ व गॅस्ट्रोचे
कसाबपुरा परिसरात वैद्यकीय व्यवसाय करणारे बालरोगतज्ज्ञ डॉ. इकबाल म्हणाले, गेल्या महिन्यापासून या भागात कावीळ व गॅस्ट्रोच्या रुग्णांत वाढ झाली आहे. साधारण ९५ टक्के रुग्ण या रोगाचे येत आहेत. रुग्णांच्या मतानुसार त्यांच्या घरात दुर्गंधीयुक्त पाणी येत आहे. यामुळे या सर्वांना स्वच्छ पाणी तेही उकळून पिण्याचा सल्ला दिला जात आहे. रुग्णांमध्ये लहान मुलांची संख्या मोठी आहे, असेही ते म्हणाले.

ओसीडब्ल्यू मुर्दाबादचे दाखविले फलक
‘लोकमत’चमूने कसाबपुरा, तकिया, नालसाहब चौक परिसराला भेट देऊन समस्या जाणून घेतली असता येथील महिला व पुरुषांनी कागदावर ‘ओसीडब्ल्यू मुर्दाबाद’ लिहून आपला रोष व्यक्त केला. तक्रारी करूनही दखल घेत नसल्याचा त्यांचा आरोप आहे.

तिसऱ्या महिन्यापासून दूषित पाण्याची तक्रार
प्रभाग ८ मधील हैदरी रोड, पनईपेठ, तकिया दिवानशा, मोहम्मद अली सराय, तकिया महबूबशा व तकिया मासुमशा या वसाहतीत दूषित पाणीपुरवठा होत असल्याची तक्रार महानगरपालिकेच्या आयुक्तांपासून ते जलप्रदाय विभागाला तिसºया महिन्यापासून करीत आहे. लोकांच्या सोयीसाठी या भागात आरोग्य शिबिरे भरविण्यात आली. मनपाकडून पाणी शुद्ध करण्यासाठी गोळ्यांचेही वाटप केले.
जुल्फेकार अहमद भुट्टो
नगरसेवक, प्रभाग ८

 

Web Title: Nagpur Maminpura area people suffered from jaundice,gastro

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.