लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शहराच्या हवाई संपर्काच्या दृष्टीने आणखी एक धक्का बसला आहे. नाशिक, छत्रपती संभाजीनगर आणि लखनऊनंतर आता नागपूर-कोल्हापूरविमानसेवाही बंद करण्यात आली आहे. अवघ्या दोन महिन्यांपूर्वी सुरू झालेली ही सेवा प्रवाशांसाठी आशेचा किरण ठरली होती. मात्र, विमान कंपनी 'स्टार एअर'ने अनपेक्षित निर्णय घेत ही सेवा बंद केली.
केवळ दोन महिनेच उड्डाणमे महिन्यात नागपूर ते कोल्हापूर ही थेट विमानसेवा सुरू करण्यात आली होती. आठवड्यातून सोमवार, शुक्रवार आणि रविवारी, दुपारी २:३५ वाजता, 'स्टार एअर'ची एस५-१३५ विमान कोल्हापूरसाठी उड्डाण करत असे. या सेवेचा प्रवाशांनी उत्साहाने लाभ घेतला होता. विशेषतः कोल्हापूरच्या १४०० वर्षांहून अधिक जुन्या महालक्ष्मी मंदिराच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांची संख्या मोठी होती. पण, ही सेवा केवळ दोन महिनेच सुरू राहिली.
नागपुरातून नाशिक, छत्रपती संभाजीनगर, लखनऊ आणि आता कोल्हापूर विमानसेवा बंद झाली आहे. या सर्व विमानसेवा उन्हाळी वेळापत्रक म्हणून एप्रिल-मे दरम्यान बंद करण्यात आल्या होत्या. जुलैअखेर हंगाम संपूनही या सेवा पुन्हा सुरू झालेल्या नाहीत.
- सध्यातरी नागपूर-कोल्हापूर सेवा ऑगस्ट महिन्यात पुन्हा सुरू होण्याची शक्यता अत्यल्प आहे. विमानसेवेबाबत कंपनीकडून कोणताही अधिकृत खुलासा करण्यात आलेला नाही. त्यामुळे ऑगस्टच्या अखेरीस प्रवाशांना पुन्हा उड्डाण मिळेल की नाही, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
- नागपूरसारख्या महत्त्वाच्या शहरातून एकामागून एक विमानसेवा बंद होणे, ही अतिशय खेदजनक बाब आहे. आम्हाला महालक्ष्मी दर्शनासाठी आता पुणे, मुंबईमार्गे वळसा घालावा लागतो.
- प्रवाशांची वाढती मागणी 3 आणि शहराचा वाढता व्याप लक्षात घेता, या सेवा लवकरात लवकर पुन्हा सुरू होणे गरजेचे असल्याच्या प्रवाशांच्या प्रतिक्रिया आहेत.