नागपुरात आईच्या विरहात युवतीने लावला गळफास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2020 23:32 IST2020-08-06T23:30:55+5:302020-08-06T23:32:41+5:30
आईच्या विरहाने अस्वस्थ झालेल्या एका युवतीने गळफास लावून आत्महत्या केली. गुरुवारी दुपारी २ च्या सुमारास अजनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.

नागपुरात आईच्या विरहात युवतीने लावला गळफास
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : आईच्या विरहाने अस्वस्थ झालेल्या एका युवतीने गळफास लावून आत्महत्या केली. गुरुवारी दुपारी २ च्या सुमारास अजनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. पल्लवी जगदीश चव्हाण (वय २१) असे मृत युवतीचे नाव असून ती अजनीच्या वसंतनगरात राहत होती. पल्लवीच्या वडिलांचे काही वर्षांपूर्वी निधन झाले. त्यानंतर आई, भाऊ करण आणि पल्लवी असे तिघेजण कुटुंबात राहिले. त्यांची आर्थिक स्थिती फारच कमकुवत होती. अशात पल्लवीच्या आईला आजाराने ग्रासले. दोन महिन्यापूर्वी तिचा मृत्यू झाला. वडील आणि आता आई गेल्यानंतर पल्लवी कमालीची व्यथित झाली होती. ती आईच्या विरहात अस्वस्थ राहायची. तिचा भाऊ करण याच्या साथीने जगण्यासाठी ती संघर्ष करू लागली. ती मनीषनगरातील एका चष्म्याच्या दुकानात काम करायची, तर करण बांधकामस्थळी काम करायचा. तो तिला कामावर जाण्यापूर्वी दुकानात सोडून देत होता आणि परत येताना सोबत घेऊन येत होता. आज नेहमीप्रमाणे त्याने पल्लवीला आॅप्टिकलमध्ये सोडून दिले आणि तो कामावर गेला. दुपारी २ च्या सुमारास पल्लवी घरी आली आणि तिने गळफास लावून घेतला. त्यांना ही बाब लक्षात आल्यानंतर करणला कळविण्यात आले. करणने अजनी पोलिसांना माहिती दिली. आई-वडिलांपाठोपाठ बहीणही निघून गेल्यामुळे चव्हाण कुटुंबातील एकटा पडलेला करण मानसिकरीत्या पुरता खचला आहे. पोलिसांनी याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे वसंतनगर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.