नागपूर दूरदर्शन केंद्र बंद पडण्याच्या मार्गावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2021 11:03 IST2021-10-12T10:52:59+5:302021-10-12T11:03:21+5:30
नागपूर दूरदर्शन प्रक्षेपणाची ही सेवा ३१ ऑक्टोबर २०२१च्या मध्यरात्रीपासून बंद केली जात आहे.

नागपूर दूरदर्शन केंद्र बंद पडण्याच्या मार्गावर
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूर दूरदर्शन केंद्रातून ३१ ऑक्टोबरपर्यंत टेरेस्टोरियल ट्रान्समिशन बंद होणार आहे. यामुळे या केंद्रातून प्रसारित होणारे कार्यक्रम भविष्यात बंद पडण्याच्या चिंतेने कर्मचाऱ्यांना ग्रासले आहे.
सध्या नागपूर दूरदर्शन केंद्रात सॅटेलाइटसाठी अपलिंकिंग आणि पीजीएफ (प्रोग्राम जनरेशन फॅसिलिटी) सेवा सुरू आहे. हे दूरदर्शन केंद्र १९८२ मध्ये सुरू झाले होते. तेव्हापासून येथे कार्यक्रमांची निर्मिती करणे आणि प्रसारण करणे सुरू आहे. मात्र आता प्रसारणाला ब्रेक लागला आहे.
या केंद्रात आता कार्यक्रम अधिकारी एकच आहे. निर्मिती सहाय्यक आणि संपादकही एकच असून, कॅमेरामन मात्र नाही. एवढेच नाही तर नव्या पदभरतीच्या कसल्याही हालचाली नाहीत. एवढ्या अपुऱ्या तांत्रिक स्टाफमध्ये कार्यक्रमांची निर्मिती होणे कठीण आहे. विदर्भातील कार्यक्रमांसाठी मुंबईतून रोज फक्त अर्धा तासाचाच वेळ दिला जात आहे. यामुळे हे केंद्र बंद पडण्याची भीती कर्मचाऱ्यांमध्ये व्यक्त होत आहे.
विदर्भातील कलावंतांसाठी नागपूर दूरदर्शन केंद्र महत्त्वाचे आहे. येथे पूर्वी २ ते ३ तासांचे कार्यक्रम तयार व्हायचे. अलीकडे सातत्याने स्टाफ घटत चालल्याने आता विदर्भातील कला, साहित्य, संस्कृती, कलावंतांना जेमतेम अर्धा तासाचा अवधी मिळत आहे. यामुळे आदिवासी क्षेत्राशी संबंधित कलेचे प्रदर्शनही प्रभावित होण्याची शक्यता आहे. ही परिस्थिती सुधारण्याऐवजी स्टाफ कमी केला जाणे आश्चर्यकारक आहे.
- जी. एस. ख्वाजा, कलाक्षेत्रातील तज्ज्ञ
दूरदर्शन ही शासकीय सेवा आहे. ती अपग्रेड होण्याची गरज आहे. स्थानिक टॅलेंटला वाव मिळणारी व्यवस्था हवी. आजही काही कार्यक्रमांमध्ये दूरदर्शनचा टीआरपी चांगला आहे.
- नरेंद्र शिंदे, सिरिअल निर्माता