नागपुरात डॉक्टरांनी पकडले दारुड्यांना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2020 22:13 IST2020-07-13T22:12:12+5:302020-07-13T22:13:41+5:30
सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या क्रिकेट मैदानात दारूची पार्टी करणाऱ्या काही व्यक्तींना रविवारी रात्री मेडिकलच्या डॉक्टरांनी अजनी पोलिसांच्या हवाली केले.

नागपुरात डॉक्टरांनी पकडले दारुड्यांना
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या क्रिकेट मैदानात दारूची पार्टी करणाऱ्या काही व्यक्तींना रविवारी रात्री मेडिकलच्या डॉक्टरांनी अजनी पोलिसांच्या हवाली केले. विशेष म्हणजे, या मैदानासमोर मुलांचे वसतिगृह आहे. सायंकाळी या मैदानावर नेहमीच असामाजिक तत्त्वांचा वावर राहत असल्याचे येथील विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. मेडिकलच्या एमबीबीएस विद्यार्थ्यांसाठी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटललगत असलेल्या क्रिकेट मैदानाचा विकास करण्यात आला आहे. परंतु येथे दिवसासोबतच रात्री उशिरापर्यंत आजूबाजूच्या वसाहतींतील मुले खेळत असतात तर काही व्यायाम करीत असतात. सायंकाळी या मैदानात असामाजिक तत्त्वे सक्रिय होतात. सर्रास दारू पिणे, अमली पदार्थांचे व्यसन करण्याचा प्रकार सुरू असतो. रविवारी सायंकाळी दुर्गानगर येथील काही युवक कारच्यावर दारूच्या बाटल्या ठेवून पार्टी करीत होते. मेडिकलचे डॉ. अर्पित धकाते व डॉ. संकेत वाढवकर तेथून जात असताना त्यांनी यावर आक्षेप घेतला व अजनी पोलिसांना याची माहिती दिली. काही वेळातच पोलीस पोहचून त्यांनी दारुड्यांना ताब्यात घेतले. मेडिकलच्या या भागात पोलिसांनी गस्त वाढवावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.