लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सत्तराव्या विशिष्ट रेल्वे सेवा पुरस्कार समारंभात मध्य रेल्वेच्यानागपूर विभागाचा मोठा गवगवा झाला. विविध विभागाच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल वेगवेगळे पुरस्कार नागपूर विभागाने मिळवले.
मध्य रेल्वेच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या प्रत्येक विभागाच्या वार्षिक कामगिरीचे मुल्यांकन रेल्वे प्रशासनाकडून केले जाते. विविध पातळीवर उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विभागांना दरवर्षी एका भव्य समारंभात विविध पुरस्कार देऊन सन्मानित केले जाते. यावेळीच्या समारंभात मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाच्या कामगिरीची विशेष प्रशंसा झाली. सांघिक पातळीवर महाव्यवस्थापकांचा सर्वांगीण कार्यक्षमतेचे प्रतिक समजले जाणारे शील्ड नागपूर आणि भुसावळ विभागांना संयुक्तपणे प्रदान करण्यात आले.
याशिवाय नागपूर विभागाने सुरक्षा, परिचालन तसेच सिग्नल व दूरसंचार या तीन महत्त्वपूर्ण श्रेणींमध्ये स्वतंत्र आंतर-विभागीय कार्यक्षमता शील्ड पटकावत सुरक्षितता, कार्यदक्षता आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या प्रभावी अंमलबजावणीतील आपले वैशिष्ट्य अधोरेखित केले. बांधकामाच्या संबंधातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल वर्धा विभागाला सर्वोत्तम बांधकाम विभागाचे शील्ड प्रदान करण्यात आले. या समारंभात नागपूर विभागातील १७ कर्मचाऱ्यांना त्यांच्या निष्ठावान, उल्लेखनीय व कर्तव्यनिष्ठ सेवेसाठी ‘विशिष्ट रेल सेवा पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. या गौरवामुळे संपूर्ण विभागाचा सन्मान उंचावल्याची भावना कर्मचारी, अधिकाऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे.
रेल्वे स्थानकावर वाजले ढोल ताशे
मुंबईहून सत्कार समारंभातून नागपूरला परतल्यानंतर विभागीय रेल्वे व्यवस्थापक विनायक गर्ग तसेच विविध अधिकाऱ्यांचे नागपूर रेल्वे स्थानकावर ढोल-ताशे, तुरई-नगारे वाजवाून जल्लोषात स्वागत करण्यात आले. यावेळी झालेल्या एका कार्यक्रमात डीआरएम विनायक गर्ग यांनी हे यश सामूहिक परिश्रम, शिस्तबद्ध कार्यसंस्कृती आणि संघभावनेमुळे प्राप्त झाल्याचे मत मांडले. त्यांनी यावेळी हे सन्मान शिल्ड रेल्वे कर्मचारी, अधिकारी आणि त्यांच्या कुटुंबियांना, विशेषतः सुरक्षिततेशी संबंधित कर्मचाऱ्यांना अर्पण करत असल्याचे सांगून त्यांच्या अथक परिश्रमांचे कौतुक केले.
Web Summary : Nagpur Railway Division shines, securing prestigious awards for outstanding performance in safety, operations, and technology. The division jointly received the General Manager's shield and individual awards, recognizing dedicated employees and collective achievements. Celebrations erupted upon their return.
Web Summary : नागपुर रेल मंडल ने सुरक्षा, संचालन और प्रौद्योगिकी में उत्कृष्ट प्रदर्शन के लिए प्रतिष्ठित पुरस्कार जीते। मंडल को संयुक्त रूप से महाप्रबंधक शील्ड और व्यक्तिगत पुरस्कार मिले, जो समर्पित कर्मचारियों और सामूहिक उपलब्धियों को पहचानते हैं। वापसी पर जश्न मनाया गया।