सुमेध वाघमारे
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मार्च व एप्रिल महिन्यात कोरोनाबाधित रुग्णांची भयावह आकडेवारी समोर येताच ऑक्सिजनचा मोठा तुटवडा पडला. गुजरात, कर्नाटक, छत्तीसगड व ओडिसामधील प्लँटमधून ऑक्सिजन आणण्याची वेळ आली. एकट्या मेडिकलमध्ये दररोज १४ ते २४ हजार क्युबिक मीटरपर्यंत ऑक्सिजन लागत असल्याने रुग्णालय प्रशासनही अडचणीत आले होते. परंतु आता रुग्णसंख्या कमी होताच ही मागणी तीन पटीने कमी होऊन ७ क्युबीक मीटरवर आली आहे.
नागपूर जिल्ह्यातील उत्पादन व जिल्हाबाहेरून साधारण ११४ मॅट्रिक टन ऑक्सिजनचा पुरवठा होत होता. परंतु एप्रिल महिन्यात ऑक्सिजनची मागणी वाढून ११५ ते १२० मॅट्रिक टनावर गेली होती. एकट्या मेडिकलमध्ये २० ते २४ हजार क्युबीक मीटरची मागणी रोज होऊ लागली होती. मेडिकलमधील २० हजार लिटरचे तीन लिक्विड ऑक्सिजन प्लांट ‘रिफलिंग’च्या प्रतीक्षेत होते. एकूणच भीषण स्थिती निर्माण झाली होती. परंतु शासनाने इतर राज्यांतून ऑक्सिजन उपलब्ध करून देण्यासाठी तातडीने पावले उचलल्याने थोडक्यात निभावले. आता तिसऱ्या लाटेत विशेषत: मेडिकलमध्ये ऑक्सिजनचा तुटवडा पडणार नाही, याचे नियोजन केले जात आहे.
-एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापासूनच मागणी वाढली
नागपूर जिल्ह्यात फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यापासून कोरोनाचा दुसऱ्या लाटेचा जोर दिसू लागला. शासकीयसह खासगी रुग्णालयांमधील ऑक्सिजनचे बेड फुल्ल होऊ लागताच ऑक्सिजनच्या मागणी प्रचंड वाढ झाली. एकट्या मेडिकलमध्ये १ एप्रिल रोजी ७ हजार क्युबीक मीटर ऑक्सिजनची मागणी असताना पाच दिवसांत १० हजार क्युबीक मीटरवर गेली. १० एप्रिल रोजी १४ हजार, १७ एप्रिल रोजी १९ हजार तर २८ एप्रिल रोजी यात वाढ होऊन २४ हजार क्युबीक मीटरवर गेली. मे महिन्यात रुग्णसंख्या कमी होऊ लागताच ऑक्सिजनची मागणीही टप्प्याटप्प्याने कमी होऊ लागली. २० मे रोजी ७ हजार क्युबीक मीटरची मागणी होती.
-ऑक्सिजनच्या मागणीत घट
मेडिकलमध्ये एप्रिल महिन्यात २० ते २४ हजार क्युबीक मीटरवर ऑक्सिजनची मागणी होत होती. परंतु आता ती ७ हजार क्यूबिक मीटरवर आल्याने काहीसा दिलासा मिळाला आहे. पुढील काही दिवसांत रुग्णसंख्या कमी झाल्यास यात आणखी घट होण्याची शक्यता आहे.
-डॉ. वासुदेव बारसागडे, प्रमुख बधिरीकरण विभाग, मेडिकल
-तिसऱ्या लाटेसाठी ऑक्सिजनचे नियोजन
कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली जात असताना मेडिकलने नियोजनाची कामे हाती घेतली आहे. यात ऑक्सिजनचा तुटवडा होणार नाही याकडे लक्ष दिले जात आहे. शासनाने क्रायोजनिक ऑक्सिजन प्लांटला मंजुरी दिली आहे. रोज साधारण हजार ते बाराशे जम्बो सिलिंडर ऑक्सिजन यातून मिळेल. हे ऑक्सिजन सामान्य वॉर्डातील रुग्णांना तर, मेडिकलमधील लिक्विड ऑक्सिजन हे आयसीयूमधील रुग्णांना देण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
-डॉ. सुधीर गुप्ता, अधिष्ठाता मेडिकल