नागपुरात सायबर गुन्हेगारांनी अख्ख्या कुटुंबाला फसवले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2020 23:48 IST2020-10-28T23:46:37+5:302020-10-28T23:48:02+5:30
Cyber criminals cheated the entire family, crime news , nagpur सायबर गुन्हेगाराच्या जाळ्यात अडकून अभियांत्रिकी शाखेच्या एका विद्यार्थ्याला आईवडील व स्वत:च्या बँक खात्याची माहिती देणे महागात पडले. गुन्हेगारांनी तिघांच्या खात्यातून १.८२ लाख रुपये परस्पर लंपास केले. ही घटना सक्करदरा पोलीस ठाणे हद्दीत घडली.

नागपुरात सायबर गुन्हेगारांनी अख्ख्या कुटुंबाला फसवले
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सायबर गुन्हेगाराच्या जाळ्यात अडकून अभियांत्रिकी शाखेच्या एका विद्यार्थ्याला आईवडील व स्वत:च्या बँक खात्याची माहिती देणे महागात पडले. गुन्हेगारांनी तिघांच्या खात्यातून १.८२ लाख रुपये परस्पर लंपास केले. ही घटना सक्करदरा पोलीस ठाणे हद्दीत घडली.
सक्करदरा येथील २६ वर्षीय साकेत इंजिनियरिंगचा विद्यार्थी आहे. त्याचे वडील वीज विभागातून सेवानिवृत्त झाले आहेत. १० सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता साकेतला कथित राजू शर्मा नावाच्या एका व्यक्तीने फोन केला. त्याने जियोमधून बोलत असल्याचे सांगत जियोची सदस्यता संपल्याची माहिती दिली. सदस्यता सुरु ठेवण्यासाठी क्विक सपोर्ट अप्लिकेशन डाऊनलोड करण्यास सांगितले. त्या माध्यमातून ५० रुपयाचा रिचार्ज करण्यास सांगितले. साकेतने ते अप्लिकेशन डाऊनलोड केले आणि रिचार्ज करू लागला. त्यापूर्वी त्याच्या मोबाईलवर ओटीपी आले. राजू शर्माने साकेतकडून ओटीपीची माहिती करून घेतली. त्याचबरोबर साकेतच्या बँक खात्यातून पैसे ट्रान्सफर झाले. रिचार्जऐवजी पैसे ट्रान्सफर झाल्याने साकेतने राजू ला विचारणा केली. शर्माने है पेसे परत करण्याचे आमिष दाखवून दुसऱ्या बँक खात्याची माहिती मागितली. दुसऱ्या खात्याची माहिती घेऊन त्यातूनही पैसे ट्रान्सफर केले. साकेतच्या दोन्ही खात्यातून १ लाख १३ हजार रुपये परस्पर लंपास केल्यानंतर कथित राजू कुटुंबातील इतर खात्यांची माहिती मागितली. साकेतने अगोदर त्याला वडील आणि नंतर आईच्या बँक खात्याची माहिती दिली. त्यांच्या मोबाईलवरही ओटीपी आले. त्याची माहितीही साकेतने राजूला दिली. या आधारावर दोन्ही खात्यातूनही पैसे लंपास केले. यानंतर साकेतशी त्याने संपर्क तोडला.
आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्याने सक्करदरा पोलिसात तक्रार केली. पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल करीत तपास सुरु केला. राजूने ज्या मोबाईलवरून फोन केला होता तो राजस्थानचा आहे. साकेत व त्याच्या आई-वडिलांच्या खात्यातून लंपास केलेली रक्कम वेगवेगळ्या खात्यांमध्ये ट्रान्सफर झाली आहे. या आधारावर पोलीस आरोपींचा शोध घेत आहे.
टोल फ्री नंबरमुळे गमावले एक लाख
त्याचप्रकारे बँकेच्या टोल फ्री नंबरवर संपर्क साधल्याने एका वृद्ध व्यक्तीस एक लाख रुपये गमवावे लागले. ६० वर्षीय सुभाष कुल्लरवार यांनी बँक खात्यातून २७५ रुपये कापण्यात आल्यामुळे २३ ऑक्टोबर रोजी टोल फ्री नंबरवर संपर्क साधला. तिथे उपस्थित आरोपीने कुल्लरवार यांना फोनवर आलेल्या ओटीपीची माहिती मागितली. यानंतर एक लिंक पाठवून ती डाऊनलोड करण्यास सांगितले. तसे करताच कुल्लरवार यांच्या खात्यातून एक लाख चार हजार रुपये ट्रान्सफर झाले. टोल फ्री किंवा कस्टमर केअर नंबरवर संपर्क केल्याने फसवण्यात आल्याच्या घटना यापूर्वीही अनेकदा घडल्या आहेत.