नागपुरात सायबर गुन्हेगाराने घातला ८० हजारांचा गंडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2020 22:20 IST2020-10-09T22:18:11+5:302020-10-09T22:20:05+5:30
Cyber criminal , fraud, Nagpur news मोबाईल रिचार्ज करण्याच्या प्रयत्नात असलेल्या एका व्यक्तीला सायबर गुन्हेगाराने ८० हजारांचा गंडा घातला. १९ जुलैला घडलेल्या या घटनेची तक्रार मिळाल्यानंतर गिट्टीखदान पोलिसांनी गुरुवारी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.

नागपुरात सायबर गुन्हेगाराने घातला ८० हजारांचा गंडा
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मोबाईल रिचार्ज करण्याच्या प्रयत्नात असलेल्या एका व्यक्तीला सायबर गुन्हेगाराने ८० हजारांचा गंडा घातला. १९ जुलैला घडलेल्या या घटनेची तक्रार मिळाल्यानंतर गिट्टीखदान पोलिसांनी गुरुवारी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.
पीडित व्यक्ती (वय ३७) गिट्टीखदानमध्ये राहतात. १९ जुलैला सकाळी ११ वाजता त्यांनी त्यांच्या पत्नीच्या मोबाईलवर ४४४ रुपयांचा रिचार्ज केला. मात्र, बॅलेन्स न आल्याने त्यांनी कस्टमर केअरला संपर्क केला. पलीकडून बोलणाऱ्या आरोपीने फिर्यादीला ४४४ रुपये परत करतो, असे सांगून त्यांचा पेटीएम नंबर आणि डेबिट कार्ड नंबर विचारला. त्यानंतर आरोपीने त्यांच्या मोबाईलवर एक लिंक पाठवून ती ओपन करण्यास सांगितले. ही लिंक ओपन करताच आरोपीने त्यांच्या खात्यातील ८० हजार रुपये लंपास केले. हा प्रकार लक्षात आल्यानंतर फिर्यादीने गिट्टीखदान ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. आरोपीचा शोध घेतला जात आहे.