नागपूर अधिवेशन होणार की नाही, १८ ला ठरणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2021 22:28 IST2021-10-11T22:27:47+5:302021-10-11T22:28:51+5:30
Nagpur News विधिमंडळाचे सचिव राजेंद्र भागवत हे १८ ऑक्टोबर रोजी नागपुरात येत आहेत. बैठकीनंतर आपला अहवाल राज्य सरकारला सादर करतील. त्या अहवालाच्या आधारावर हिवाळी अधिवेशन नागपुरात होणार की नाही, हे निश्चित केले जाईल.

नागपूर अधिवेशन होणार की नाही, १८ ला ठरणार
नागपूर : विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन दोन वर्षांनंतर ७ डिसेंबरपासून नागपुरात होणार आहे. मान्सून अधिवेशनात याची घोषणा करण्यात आली होती. सध्याची परिस्थिती पाहता अधिवेशन नागपुरातच होण्याची चर्चाही आहे. परंतु यासंदर्भातील तयारी पाहता अधिवेशन होईल की नाही, अशी शंकाही निर्माण केली जात आहे.
विधिमंडळाचे सचिव राजेंद्र भागवत हे १८ ऑक्टोबर रोजी नागपुरात येत आहेत. या दरम्यान ते अधिवेशनाच्या तयारीचा आढावा घेतील. भागवत बैठकीनंतर आपला अहवाल राज्य सरकारला सादर करतील. त्या अहवालाच्या आधारावर हिवाळी अधिवेशन नागपुरात होणार की नाही, हे निश्चित केले जाईल.
या बैठकीत विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त, मनपा आयुक्तांसह सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी उपस्थित राहतील. डिसेंबर २०१९ मध्ये नागपुरात हिवाळी अधिवेशन पार पडले होते. कोविड संक्रमणामुळे त्यानंतरची सर्व अधिवेशने मुंबईत झाली. यावर्षीही अर्थसंकल्पीय व मान्सून अधिवेशन मुंबईतच झाले. नागपूर करारानुसार वर्षातील एक अधिवेशन नागपुरात होणे बंधनकारक आहे. विधिमंडळातील सूत्रानुसार सरकारला नागपुरात अधिवेशन घ्यायचे आहे. परंतु, तयारी पाहून याबाबतचा निर्णय घेतला जाईल. कंत्राटदार थकीत बिलांमुळे आक्रमक भूमिकेत आहेत. आमदार निवासाचे कामही अर्धवट आहे. वरून येथील दोन इमारतींमध्ये कोविड सेंटर असून ते खाली करण्यास सांगण्यात आले आहे.
सूत्रांचे म्हणणे आहे की, नागपुरात अधिवेशन घ्यायचे असेल तर सरकारला तातडीने निधी उपलब्ध करावा लागेल. तसेच तयारीच्या कामाला गतीही द्यावी लागेल.