लसीकरणात नागपूरची घसरण सुरूच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:57 IST2021-02-05T04:57:35+5:302021-02-05T04:57:35+5:30
नागपूर : राज्यात कोरोना प्रतिबंधक लसीकरणात नागपूर जिल्ह्याची घसरण सुरूच आहे. गुरुवारी ७२ टक्के लसीकरण होऊन १९ व्या स्थानी ...

लसीकरणात नागपूरची घसरण सुरूच
नागपूर : राज्यात कोरोना प्रतिबंधक लसीकरणात नागपूर जिल्ह्याची घसरण सुरूच आहे. गुरुवारी ७२ टक्के लसीकरण होऊन १९ व्या स्थानी असलेला नागपूर जिल्हा शुक्रवारी ६१.०७ टक्के लसीकरणामुळे २५ व्या स्थानी पोहोचला. विशेष म्हणजे, सर्वाधिक लसीकरण झालेल्या पहिल्या पाच जिल्ह्यात विदर्भातील वर्धेची वर्णी लागली आहे.
नागपूर जिल्ह्यात लसीकरणाचे केंद्रे १२ वरून ३० झाली आहेत. परंतु प्रतिसाद कमी-कमी होत चालला आहे. आज ग्रामीण भागातील १३ केंद्रांना १,३०० लसीकरणाचे लक्ष्य देण्यात आले होते. त्यापैकी ६४२ लाभार्थ्यांना लस देण्यात आली. हे प्रमाण ४९.४ टक्के आहे. सर्वात जास्त १३६ टक्के लसीकरण हिंगणा केंद्रावर झाले. सर्वात कमी, १३ टक्के लसीकरण कळमेश्वर केंद्रावर झाले.
- शहरात ७० टक्के लसीकरण
शहरात गुरुवारपासून १० लसीकरण नव्या केंद्राची भर पडली. सध्या १७ केंद्र आहेत. शुक्रवारी प्रत्येकी केंद्राला १०० नुसार १,७०० लाभार्थ्यांच्या लसीकरणाचे लक्ष्य देण्यात आले होते. परंतु ११९० लाभार्थ्यांना लस देणे शक्य झाले. याचे प्रमाण ७० टक्क्यांवर गेले. सर्वात कमी लसीकरण अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेच्या (एम्स) केंद्रात झाले. १०० मधून केवळ ६ लाभार्थ्यांनी लस घेतली. त्यानंतर मेडिकलच्या दोन केंद्रापैकी एका केंद्रावर १०० पैकी १५ तर दुस-या केंद्रावर १०० पैकी २१ लाभार्थ्यांना लस देण्यात आली. सर्वाधिक लसीकरण सिम्स हॉस्पिटलमधील केंद्रावर झाले. १४१ टक्के लसीकरण झाले.
- शहरात ५,९२४ लाभार्थ्यांनी घेतली लस
शहरात मागील ९ दिवसांत ९,१०० लाभार्थ्यांच्या लसीकरणाचे लक्ष्य देण्यात आले होते. त्यापैकी ५,९२४ लाभार्थ्यांनी लस देण्यात आली. याची टक्केवारी ६५.१ टक्के आहे. सर्वात कमी लसीकरण मेडिकलच्या केंद्रावर झाले. येथे कोव्हॅक्सीन लस दिली जात आहे. उर्वरित १५ केंद्रांवर कोव्हिशील्ड लस दिली जात आहे.