- गणेश हूड नागपूर - संसदेच्या अधिवेशनात गृहमंत्री अमित शहा यांनी जाणीवपूर्वक आणि तथ्यहीन भूमिका मांडली. त्यांनी भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान केला आहे. त्यामुळे त्यांना या पदावर राहण्याचा कोणताही अधिकार नाही. त्यांना तातडीने पदावरून दूर करावे, अशी मागणी करीत गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून काँग्रेस नेत्यांनी गुरुवारी जिल्हाधिकारी विपीन इटनकर यांना याबाबत निवेदन दिले. जोपर्यंत अमित शहा राजीनामा देणार नाही. तो पर्यंत आंदोलन जारी ठेवण्याचा इशारा यावेळी दिला.
खासदार श्यामकुमार बर्वे, माजी मंत्री सुनील केदार, जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष मुक्ता कोकड्डे, उपाध्यक्ष कुंदा राऊत, माजी अध्यक्ष सुरेश भोयर, प्रफुल्ल गुडधे, जि.प.चे माजी सदस्य देवेंद्र गोडबोले, जि.प.चे सभापती राजकुमार कुसुंबे, मिलींद सुटे, शांता कुमरे, तापेश्वर वैद्य, दुधाराम सव्वालाखे, संजय जगताप, यांच्यासह जि.प. सदस्य, पंचायत समित्यांचे सभापती, सरपंच व ग्रामीण भागातील काँग्रेस कार्यकर्ते या मोर्चात सहभागी झाले होते. नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. संसदेच्या अधिवेशनात केंद्रीय गृहमंत्री शहा यांनी डॉ आंबेडकर यांच्या विषयी केलेल्या विधानाचे पडसाद अद्यापही उमटत आहे. यावर काँग्रेसही आक्रमक झाली आहे. भारतीय जनता पक्ष आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तळागाळातल्या आणि उपेक्षितांना न्याय देणारी भूमिका त्यांना मान्य नाही. अशी टीका विविध पदाधिकारी आणि नेत्यांनी यावेळी भाजपवर टीका केली.