नागपूर ढगाळलेले, विदर्भात सर्वत्र पाऊस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 07:00 IST2021-03-24T07:00:00+5:302021-03-24T07:00:23+5:30
Nagpur news मागील आठवडाभरापासून सुरू असलेल्या पावसाने मंगळवारीही नागपुरात हजेरी लावली. दिवसभर आकाश ढगाळलेले होते. हवामान विभागाच्या नागपूर प्रादेशिक केंद्राने नागपुरात २ मिमी पावसाची नोंद घेतली आहे.

नागपूर ढगाळलेले, विदर्भात सर्वत्र पाऊस
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मागील आठवडाभरापासून सुरू असलेल्या पावसाने मंगळवारीही नागपुरात हजेरी लावली. दिवसभर आकाश ढगाळलेले होते. हवामान विभागाच्या नागपूर प्रादेशिक केंद्राने नागपुरात २ मिमी पावसाची नोंद घेतली आहे.
शहरात पहाटेपासूनच पाऊस सुरू झाला. सकाळीही अनेक भागामध्ये पावसाने हजेरी लावली. त्यानंतरही दिवसभर आकाश ढगांनी दाटले होते. वातावरणात गारवाही होता. आर्द्रता प्रचंड वाढलेली होती. सकाळी ९८ टक्के तर सायंकाळी ती ९४ टक्के नोंदविली गेली. यामुळे तापमानही बरेच खालावले होते. दिवसभरात २४.९ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली. या महिन्यातील ही तापमानाची सर्वात कमी झालेली नोंद आहे.
विदर्भातही मंगळवारी बहुतेक सर्वच जिल्ह्यांमध्ये पावसाने हजेरी लावली. अमरावतीमध्ये २.८ मिमी पाऊस पडला. गोंदियात २.२, वर्ध्यामध्ये ३.६ , अकोल्यामध्ये ५.६ तर बुलडाणा जिल्ह्यात ३ मिमी पावसाची नोंद झाली आहे. नागपूरसह गोंदिया, यवतमाळ, अमरावती, अकोला या ठिकाणचा पारा बराच खालावला होता.
पुन्हा पावसाचा इशारा
विदर्भातील सर्वच जिल्ह्यांमध्ये २४ मार्चला पुन्हा पावसाचा इशारा देण्यात आला आहे. बहुतेक ठिकाणी विजा आणि मेघगर्जनासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस वर्तविण्यात आला आहे. मंगळवारच्या पावसाने नागपूर जिल्ह्यात शेतीच्या नुकसानीचे वृत्त नाही.
...