कॅलेंडर बदलताच, नागपूर शहर महिला काँग्रेसने दोन्ही अध्यक्ष बदलले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2022 07:00 IST2022-01-01T07:00:00+5:302022-01-01T07:00:10+5:30
Nagpur News नागपूर शहर महिला काँग्रेसच्या अध्यक्षपदी नॅश नुसरत अली यांची वर्णी लागली असून ग्रामीणच्या जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी जि.प. सदस्य अवंतिका लेकुरवाळे यांच्यावर सोपविण्यात आली आहे.

कॅलेंडर बदलताच, नागपूर शहर महिला काँग्रेसने दोन्ही अध्यक्ष बदलले
नागपूर : नववर्षाच्या पूर्वसंध्येला महिला काँग्रेसमध्ये फेरबदल करण्यात आले आहेत. नागपूर शहर महिला काँग्रेसच्या अध्यक्षपदी नॅश नुसरत अली यांची वर्णी लागली असून ग्रामीणच्या जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी जि.प. सदस्य अवंतिका लेकुरवाळे यांच्यावर सोपविण्यात आली आहे. मात्र, नवे शिलेदार मिळताच जुन्या पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी उफाळून आली आहे. मावळत्या शहराध्यक्ष प्रज्ञा बडवाई यांनी या बदलावर नाराजी व्यक्त करीत प्रदेश सचिव या नव्या जबाबदारीचा राजीनामा दिला आहे.
महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष संध्या सव्वालाखे यांच्या नेतृत्वातील प्रदेश कार्यकारिणीची शुक्रवारी घोषणा करण्यात आली. यात बऱ्याच ठिकाणचे शहर व जिल्हाध्यक्ष बदलण्यात आले आहेत. नागपुरात नव्या दमाच्या कार्यकर्त्या नॅश अली यांना अध्यक्षपदाची संधी मिळाली आहे. तर, मावळत्या अध्यक्ष प्रज्ञा बडवाईक यांना प्रदेश सचिवपदी सामावून घेण्यात आले आहे. मात्र, या बदलावर नाराज असलेल्या बडवाईक यांनी कार्यकारिणी जाहीर होताच प्रदेश सचिवपदाचा राजीनामा दिला. मुंबई व दिल्लीच्या फेऱ्या मारणाऱ्यांना पदे दिली जात आहेत. स्थानिक पातळीवर राबणा-यांवर हा अन्याय आहे. याविरोधात मोठ्या प्रमाणात महिला पदाधिकारी राजीनामा देतील, असा दावाही बडवाईक यांनी लोकमतशी बोलताना केला.
ग्रामीणच्या मावळत्या अध्यक्ष तक्षशीला वाघधरे यांना बढती देत प्रदेश सचिवपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. जिल्हा परिषदेच्या पोटनिवडणुकीत मोठ्या फरकाने विजय मिळविणाऱ्या सत्तापक्ष नेत्या अवंतिका लेकुरवाळे यांच्यावर जिल्हाध्यक्षपदाची धुरा सोपविण्यात आली आहे.
एकही उपाध्यक्ष नाही
- प्रदेश कार्यकारिणीमध्ये नागपुरातून उपाध्यक्षपदी कुणालाही संधी मिळालेली नाही. प्रदेश महासचिव म्हणून शांता कुमरे, कांता पराते, रीचा जैन, प्रदेश सचिवपदी वैशाली मानवटकर, वर्षा गुजर, पूनम कांबळे, तर कार्यकारिणी सदस्य म्हणून छाया निमसरकर, नरसीन फतिमा हैदरी यांचीही नियुक्ती करण्यात आली आहे.