-तर ‘जलयुक्त’ होणार नागपूर!
By Admin | Updated: June 6, 2017 01:43 IST2017-06-06T01:43:29+5:302017-06-06T01:43:29+5:30
राज्य सरकारच्या जलयुक्त शिवार उपक्रमामुळे भूगर्भातील पाण्याची पातळी निश्चित वाढेल.

-तर ‘जलयुक्त’ होणार नागपूर!
सिमेंट रोड ठरणार डोकेदुखी पावसाचे पाणी घरात शिरणार रस्ते झाले उंच; घरे पडली ठेंगणी मनपाचे नियोजन फसले
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राज्य सरकारच्या जलयुक्त शिवार उपक्रमामुळे भूगर्भातील पाण्याची पातळी निश्चित वाढेल. मात्र नागपूर महापालिकेचे चुकीचे नियोजन आणि कंत्राटदारांनी सिमेंट रोडच्या कामात केलेल्या हलगर्जीपणामुळे यंदाच्या पावसाळ्यात नागपूर ‘जलयुक्त’ निश्चितच होणार आहे. रस्ते उंच आणि घर ठेंगणे झाल्याने, पावसाळ्यात घरात पाणी शिरणार आहे. लोकमत चमूने सिमेंट रोडचे बांधकाम झालेल्या शहरातील सर्व प्रमुख मार्गावरील रस्तांच्या आढावा घेतला असता कामातील त्रुटीमुळे सामान्य नागरिकांना सर्वाधिक फटका बसणार असल्याचे दिसून आले. इकडे पावसाळी पाणी घरात शिरू नये म्हणून सिमेंट रोडलगत घर आणि व्यावसायिक प्रतिष्ठान असलेल्या नागपूरकरांना घराची आणि आवारभिंतीची उंची वाढवावी लागणार असल्याने खिशावर अतिरिक्त भार पडणार आहे.
दुर्गानगरातील वास्तव
दक्षिण नागपुरात दुर्गानगर परिसरात सिमेंटरोडचे बांधकाम अंतिम टप्प्यात आहेत. अजून पावसाळाही सुरू व्हायचा आहे. परंतु या रस्त्याच्या दोन्ही बाजूला राहणाऱ्या लोकांमध्ये पावसाच्या पाण्याची भीती जाणवू लागली आहे. मानेवाडा रोड ते अयोध्यानगरला जोडणारा हा रस्ता आहे. या रस्त्यावर किमान १०० ते १५० घरे दोन्ही बाजूला आहे. या रस्त्याच्या सिमेंटीकरणाचे काम गेल्या काही महिन्यांपासून सुरू आहे. रस्ता बनून तयार झाला आहे. आता फुटपाथचे काम सुरू आहे. परंतु या रस्त्यामुळे अनेकांची घरे रस्त्याखाली आली आहे. त्यामुळे पावसाळ्याचे पाणी घरात शिरण्याची भीती त्यांना आहे. रस्त्यावरून वाहणाऱ्या पाण्याचा निचरा व्हावा यासाठी आवश्यक चेंबर दिलेले नाही. रस्त्याचे पाणी घरात शिरणार नाही यासाठी येथील रहिवाशांना भरण टाकून रस्त्याच्या लेव्हलमध्ये अंगण आणायचे आहे. रस्त्यामुळे आगाऊचा भुर्दंड आमच्यावर बसणार असल्याची प्रतिक्रिया या रस्त्यावरील रहिवाशांची आहे.
रस्त्यामुळे ५० हजारांचा खर्च आहे
रस्त्याच्या बांधकामाच्या सुरुवातीलाच आमचे पाणी पुरवठ्याचे कनेक्शन तुटले. आता हा रस्ता बनलाय. रस्ता उंच आणि घर ठेंगणे असे झाले आहे. त्यामुळे पावसाचे पाणी घरात शिरू नये त्यासाठी आता ५० हजारांचा खर्च करावा लागणार आहे.
- मीनल भाके, रहिवासी, दुर्गानगर