नागपूर झाले स्कॅम कॅपिटल
By Admin | Updated: May 11, 2014 01:22 IST2014-05-11T01:22:00+5:302014-05-11T01:22:00+5:30
देशाचे हृदयस्थान अशी गौरवपूर्ण ओळख असलेले नागपूर आता घोटाळ्यांचे शहर म्हणून ओळख निर्माण करीत आहे. तीन वर्षात नागपुरात आर्थिक फसवणुकीची चार मोठी प्रकरणे उजेडात आली.

नागपूर झाले स्कॅम कॅपिटल
नरेश डोंगरे - नागपूर
देशाचे हृदयस्थान अशी गौरवपूर्ण ओळख असलेले नागपूर आता घोटाळ्यांचे शहर म्हणून ओळख निर्माण करीत आहे. तीन वर्षात नागपुरात आर्थिक फसवणुकीची चार मोठी प्रकरणे उजेडात आली. आकर्षक व्याजाचे आमिष दाखवून या चार कंपन्यांच्या संचालकांनी सुमारे १० हजार गुंतवणूकदारांची फसवणूक केली. त्यांचे तीन ते साडेतीन हजार कोटी रुपये हडपले. गुंतवणूकदारांना धडकी भरविणारे हे घोटाळे केवळ नागपूर-विदर्भच नव्हे तर सर्वत्र चर्चा अन् चिंतेचा विषय ठरले आहेत. २०११ मध्ये नागपुरात प्रमोद अग्रवाल या ठगबाजाने खळबळ उडवून दिली. या हरामखोर माणसाने उपराजधानीतील गर्भ श्रीमंतांसोबतच गोरगरिबांच्याही आयुष्याची पुंजी हडपली. महादेव लॅण्ड डेव्हलपर्स आणि कळमना सोसायटीच्या नावाखाली त्याने अगदी रोजमजुरी करणार्यांचीही घामाची कमाई गिळंकृत केली. घरोघरी ‘पिग्गी बँक‘ वाटप करून मुलांच्या खाऊचे पैसेही या नराधमाने गिळले. त्याची भामटेगिरी उघड झाल्यानंतर पोलिसांनी त्याच्याविरुद्ध गुन्हे दाखल करून त्याला अटक केली. त्याने ३ ते ४ हजार गुंतवणूकदारांना सुमारे ५०० कोटी रुपयांनी गंडविल्याची चर्चा होती. २०१२ मध्ये वर्षा आणि जयंत झामरे या दाम्पत्याने शेकडो गुंतवणूकदारांना कोट्यवधींचा गंडा घातला. जे. एस. फायनान्स कंपनीच्या नावाखाली झामरे दाम्पत्याने शहरातील छोट्यामोठ्या व्यापारी, उद्योजकांसह ५०० वर गुंतवणूकदारांना करोडोंचा गंडा घातला. पोलिसांनी २१ मे २०१२ ला वर्षा आणि जून २०१२ मध्ये जयंतला अटक केली. मात्र, त्यांनी नेमकी किती जणांची किती रुपयांनी फसवणूक केली ते अधिकृतपणे स्पष्ट झाले नाही. झामरे दाम्पत्याच्या फसवणुकीचा आकडा कुणी ५० कोटी तर कुणी १०० कोटींचा सांगतात. २०१३ मध्ये विदर्भच नव्हे तर महाराष्टात खळबळ उडवून देणारे श्री सूर्या समूहाचा घोटाळा उजेडात आला.