गृहमंत्र्यांच्या समर्थनार्थ सरसावले नागपुरातील बुद्धिजीवी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2021 04:09 IST2021-04-01T04:09:08+5:302021-04-01T04:09:08+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटींच्या ‘टार्गेट’बाबत ...

गृहमंत्र्यांच्या समर्थनार्थ सरसावले नागपुरातील बुद्धिजीवी
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटींच्या ‘टार्गेट’बाबत टाकलेल्या ‘लेटरबॉम्ब’नंतर राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. उपराजधानीतील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी या प्रकाराबाबत नाराजीचा सूर व्यक्त करत देशमुख यांची पाठराखण केली आहे. देशमुख यांच्यावर आजपर्यंत एकदाही आरोप लागले नाही. एका निनावी पत्रावरून चौकशीचा पायंडा पडला तर तो विचित्र प्रकार होईल. आज जे सुपात आहेत ते जात्यात येऊ शकतील. या राजकारणाचा नागरिकांनी विरोध करावा, असे आवाहन एका पत्राच्या माध्यमातून करण्यात आले आहे.
बुधवारी ‘सोशल मीडिया’वर डॉ. सुखदेव थोरात, डॉ. यशवंत मनोहर, डॉ. गिरीश गांधी, डॉ. पूरण मेश्राम, अरुणा सबाने, डॉ. प्रदीप विटाळकर, डॉ. दिवाकर गमे, डॉ. बबन नाखले यांचा दाखला देत संबंधित पत्र ‘व्हायरल’ झाले. आरोप-प्रत्यारोपांच्या धुळवडीत महाराष्ट्राचे राजकारण गढूळ झाले आहे. सुजाण नागरिकांना हे पसंत पडलेले नाही. ज्या व्यक्तीने देशमुख यांच्यावर आरोप केले आहे ती शासकीय सेवेत असून असे पहिल्यांदाच घडत आहे. अनिल देशमुख आपले निर्दोषत्व सिद्ध करतीलच. मात्र अशा प्रकारामुळे राज्यातील राजकारण आणखी गढूळ होईल, असे या पत्रात नमूद करण्यात आले आहे. यासंदर्भात गिरीश गांधी यांना विचारणा केली असता त्यांनी हे पत्र बुद्धिजीवींनी एकत्रित येऊन मांडलेली भूमिका असल्याचे स्पष्ट केले.