CoronaVirus in Nagpur : नागपुरात पुन्हा रुग्णसंख्येचा उच्चांक, ६३ पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2020 23:44 IST2020-06-19T23:42:44+5:302020-06-19T23:44:26+5:30
कोरोनाबाधितांच्या संख्येने शुक्रवारी पुन्हा एकदा उच्चांक गाठला. तब्बल ६३ रुग्ण पॉझिटिव्ह आले. रुग्णांची संख्या आता १२०५वर पोहचली आहे.

CoronaVirus in Nagpur : नागपुरात पुन्हा रुग्णसंख्येचा उच्चांक, ६३ पॉझिटिव्ह
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोनाबाधितांच्या संख्येने शुक्रवारी पुन्हा एकदा उच्चांक गाठला. तब्बल ६३ रुग्ण पॉझिटिव्ह आले. रुग्णांची संख्या आता १२०५वर पोहचली आहे. विशेष म्हणजे, रात्री एम्समध्ये तपासण्यात आलेल्या नमुन्यांमध्ये ४३ रुग्णांचे निदान झाले. यातील बहुसंख्य रुग्ण हे चंद्रमणीनगर, काटोल चौक, हंसापुरी व मोमीनपुरा वसहतीतील आहेत. या महिन्यात चारदा रुग्णांचा आकडा ५० वर गेला. आतापर्यंत सर्वाधिक ८६ रुग्णांची नोंदही याच महिन्यात झाली आहे. विशेष म्हणजे, त्रिमूर्ती नगरातही आता कोरोनाचा शिरकाव झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
लॉकडाऊन अनलॉक होताच नव्या वसाहतींमधून बाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. आज मेयोच्या प्रयोगशाळेत बजेरिया, नाईक तलाव-बांगलादेश, हंसापुरी व लष्करीबाग येथील प्रत्येकी एक रुग्ण, सिम्बॉयसिसमध्ये उपचार घेत असलेले दोन तर हिंगणा येथील शिक्षक कॉलनी येथून तीन असे नऊ रुग्ण पॉझिटिव्ह आले. मेडिकलच्या प्रयोगशाळेतून झिंगाबाई टाकळी येथून एक रुग्ण पॉझिटिव्ह आला. नीरीच्या प्रयोगशाळेतून वायुसेनानगर येथील चार रुग्ण पॉझिटिव्ह आले. खासगी प्रयोगशाळेतून सहा रुग्ण पॉझिटिव्ह आले. यात तीन रुग्ण प्रीतम विहार कॉलनी, ऑटोमोटिव्ह चौक कामठी रोड येथील आहेत. दोन रुग्ण त्रिमूर्ती नगर, तर एक रुग्ण गडचिरोली येथील आहे. हा रुग्ण नागपुरात उपचारासाठी आला असताना अहवाल पॉझिटिव्ह आला. एम्सने रात्रीपर्यंत ७५ नमुने तपासले असता यातील ४३ रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. हे सर्व रुग्ण पाचपावली क्वारंंटाईन सेंटरमधील आहेत. यात सर्वाधिक रुग्ण हे चंद्रमणीनगर, काटोल चौक, हंसापुरी व मोमीनपुरा वसाहतीतील असल्याचे सांगण्यात येते.
ग्रामीणमध्ये सात रुग्ण पॉझिटिव्ह
शहरात रुग्णांचा धडाका सुरू असताना नागपूरच्या ग्रामीण भागामध्येही रुग्णांची संख्या वाढताना दिसून येत आहे. आज कामठी खैरी येथे तीन, कळमेश्वर ब्राह्मणी येथे एक तर वानाडोंगरी येथे तीन असे एकूण सात रुग्ण पॉझिटिव्ह आले. कळमेश्वर-ब्राह्मणी येथे पहिल्यांदाच कोरोनाचा रुग्ण आढळून आल्याने आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. मुंबई येथून हा रुग्ण कुटुंबासह कळमेश्वरमध्ये आला असल्याची माहिती आहे. कामठी खैरी येथील एका खासगी कंपनीत तीन रुग्ण पॉझिटिव्ह आढळले. हे तिन्ही मजूर दिल्लीवरून १४ जून रोजी आले. तेव्हापासून ते कंपनीमध्येच आयसोलेशन कक्षात होते. कंपनी व लगतची वसाहत सील केल्याचे सांगण्यात येते.
४२ रुग्णांना डिस्चार्ज
मेयोमधून २९ रुग्णांना सुटी देण्यात आली. यात नाईक तलाव-बांगलादेश येथील १६, इसासनी येथील २, सतरंजीपुरा येथील १, प्रेमनगर येथील ४, लष्करीबाग येथील १, भानखेडा येथील १, हिंगणा येथील २, मोमीनपुरा येथील १ तर कोरोडा येथील १ रुग्णाचा समावेश आहे. मेडिकलमधून १३ रुग्णांना सुटी देण्यात आली. यात रुग्ण नाईक तलाव-बांगलादेश येथील पाच, मोमनपुरा येथील दोन, हंसापुरी येथील एक, अजनी येथील दोन, मोमीनपुरा येथील दोन तर टिमकी येथील एक रुग्ण आहे.
दैनिक संशयित २७८
दैनिक तपासणी नमुने ३२८
दैनिक निगेटिव्ह नमुने २७१
नागपुरातील पॉझिटिव्ह नमुने १२०५
नागपुरातील मृत्यू १८
डिस्चार्ज केलेले पॉझिटिव्ह रुग्ण ८१२
डिस्चार्ज केलेले संशयित रुग्ण ३७६५
क्वारंटाईन कक्षात एकूण संशयित २५८२
पीडित- १२०५
दुरुस्त-७७०
मृत्यू-१८