Corona virus : नागपुरात पुन्हा ३६ संशयिताचे नमुने निगेटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2020 21:43 IST2020-03-25T21:39:37+5:302020-03-25T21:43:59+5:30
तीन आठवड्यात ४५१ संशयित रुग्णांचे नमुने निगेटिव्ह आले आहेत. बुधवारी पुन्हा ३६ नमुन्यात एकही बाधित रुग्ण आढळून आलेला नाही. यामुळे डॉक्टरांना मोठा दिलासा मिळाला आहे.

Corona virus : नागपुरात पुन्हा ३६ संशयिताचे नमुने निगेटिव्ह
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : तीन आठवड्यात ४५१ संशयित रुग्णांचे नमुने निगेटिव्ह आले आहेत. बुधवारी पुन्हा ३६ नमुन्यात एकही बाधित रुग्ण आढळून आलेला नाही. यामुळे डॉक्टरांना मोठा दिलासा मिळाला आहे. पहिल्या पॉझिटिव्ह रुग्णाचे आज पुन्हा नमुने घेऊन तपासणीसाठी पाठविण्यात येणार आहे. गुरुवारी नमुना निगेटिव्ह आल्यास कोरोना मुक्त होणारा मध्य भारतातील पहिला रुग्ण ठरेल. विशेष म्हणजे, या रुग्णाच्या पत्नीला व आणखी एका पुरुष रुग्णाला उद्या १४ दिवस पूर्ण होत आहे. त्यांच्याबाबतही लवकरच निर्णय घेतला जाणार आहे. जगभरात तांडव माजवणाऱ्या या विषाणूचा शिरकाव नागपुरात होताच, जिल्हा प्रशासनाने व वैद्यकीय यंत्रणेने तातडीने उपाययोजना केल्यात. यामुळे २१ दिवसाचा कालावधी होऊनही बाधित रुग्णांची संख्या चारवरच स्थिर आहे. त्यानंतर तपासण्यात आलेले सर्वच नमुने निगेटिव्ह आले आहेत. बुधवारी पहिल्या टप्प्यात मेयोच्या प्रयोगशाळेला ३६ नमुने प्राप्त झालेत. यात मेयोमधून ११, मेडिकलमधून ६, महानगरपालिकेमधून ८, यवतमाळ, सावंगी मेघे वर्धा, गोंदिया, बुलडाणा, गडचिरोली व नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटमधून प्रत्येकी १ तर अमरावतीमधून ५ असे ३६ नमुने आले. हे सर्व नमुने निगेटिव्ह आले. यामुळे कोरोना विषाणूच्या लढाईत यश येऊ पाहत आहे. लोकांनी पुढील २० दिवस घरीच थांबल्यास सकारात्मक चित्र दिसून येण्याचीही शक्यता डॉक्टरांनी वर्तवली आहे. होम कारन्टाइन मेयो, मेडिकलमध्ये संशयित म्हणून दाखल झालेल्या आतापर्यंत २२२ रुग्णांचे नमुने निगेटिव्ह आले तरी त्यांना १४ दिवस होम कारन्टाइन करून ठेवण्यात आले आहे. यातील ४७ संशयितांना १४ दिवसानंतरही कुठलीही लक्षणे आढळून आलेली नाहीत. परंतु त्यानंतरही खबरदारीचे उपाय म्हणून त्यांना घरीच थांबण्याचा सल्ला देण्यात आला आहे. मेयो, मेडिकलमध्ये १० संशयित रुग्णांची बुधवारी मेयोमध्ये आणखी ८ संशयित रुग्ण दाखल झाले तर मेडिकलमध्ये दोन रुग्ण दाखल झाले आहेत. यात एक पुरुष व एक महिला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर आतापर्यंत ११२३ प्रवाशांची तपासणी करण्यात आली. सध्या १६५ प्रवासी विलगीकरण कक्षात आहेत. आज २३ प्रवाशांना या कक्षातून घरी पाठविण्यात आले.