- निशांत वानखेडे नागपूर - साेमवारी सकाळपासून नागपूरसह विदर्भात बहुतेक ठिकाणी ढगाळ वातावरणासह हलके धुके जमल्यासारखे चित्र हाेते. रविवारी ११ अंशावर असलेला नागपूरचा पारा २४ तासात १४.६ अंशावर गेला. हवामान विभागाच्या अंदाजानुसार विदर्भात दाेन दिवस माफक थंडी, त्यानंतर पाऊस आणि गारपीट हाेण्याचीही शक्यता आहे. म्हणजे या आठवड्यात थंडी, पाऊस, गारपीट व पुन्हा थंडी असे समिश्र वातावरण अनुभवण्याची शक्यता आहे.
साेमवारी किमान तापमान २.८ अंशाने वाढून सरासरीच्या पुढे गेले. मात्र ढगाळ वातावरणामुळे माफक गारवा जाणवत राहिला. अंदाजानुसार दाेन दिवस नागपूरसह संपूर्ण महाराष्ट्रात बोचऱ्या वाऱ्यासहित माफक प्रमाणात थंडीची शक्यता ही कायम आहे. २५ व २६ डिसेंबरला ढगाळ वातावरणासहित किंचितशीच थंडी कमी होवून ऊबदारपणा जाणवेल. त्यानंतर २६ ते २८ डिसेंबरदरम्यान संपूर्ण महाराष्ट्रात ढगाळ वातावरण राहून तुरळक ठिकाणी गडगडाटीसह किरकोळ पावसाची शक्यता जाणवते. विशेषतः नागपूर, अकोला, अमरावती, गोंदिया चंद्रपूर, वाशिम, शेगाव, तसेच महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात पावसाची शक्यता अधिक जाणवते.
सध्याच्या वातावरणीय घडामोडी पाहता २७ डिसेंबरला विदर्भातील अकोला, अमरावती, नागपूर, गोंदिया, वर्धा, वाशिम व मध्य महाराष्ट्र व मराठवाडा अशा एकूण २५ जिल्ह्यांत तूरळक ठिकाणी किरकोळ गारपीटीची शक्यता जाणवते. त्यानंतर वर्षाअखेरीस म्हणजे ३० डिसेंबरपासून हळूहळू थंडीत वाढ होवुन नववर्षाच्या उगवतीला पुन्हा थंडी वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
यामुळे गारपीट२६ डिसेंबर दरम्यान देशात प्रवेशलेले प्रखर पश्चिम प्रकोपाच्या प्रेरित परिणामातून व राजस्थानच्या आग्नेयला दिड ते दोन किमी. उंचीपर्यंतच्या पातळीतील थंड कोरडे चक्रीय वाऱ्यांची व ८०० मीटर उंचीपर्यंतच्या खालच्या पातळीतील अरबी समुद्रातून नैरुक्त दिशेकडून तर बं. उपसागरातून पूर्व दिशेकडून आलेल्या आर्द्रतायुक्त वारे अशा तीन वाऱ्यांच्या टक्करीतून द्रविकरणाची स्टेज लगेचच ओलांडून घनीभवन होवून गारपीट होण्याची शक्यता निर्माण होत आहे, अशी माहिती हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी दिली आहे.