In Nagpur 115 police took resolution to organ donate | नागपुरात ११५ पोलीसांनी केला अवयवदानाचा संकल्प
नागपुरात ११५ पोलीसांनी केला अवयवदानाचा संकल्प

ठळक मुद्देसमितीकडे फॉर्म भरले : उपायुक्त, सहायक आयुक्तांचाही सहभाग

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पोलीस उपायुक्त गजानन शिवलिंग राजमाने, सहायक आयुक्त चक्षूपाल बहादुरे यांच्यासह वाहतूक शाखेतील ११५ पोलिसांनी आज स्वेच्छेने अवयव दान करण्याचा संकल्प केला. त्यासंबंधिचे अर्ज त्यांनी समितीकडे भरून दिले. एवढ्या मोठ्या प्रमाणात एकाच वेळी अवयवदानाचे फॉर्म भरून देण्याचा पोलीस दलातील हा कार्यक्रम सिव्हील लाईन्समधील पोलीस जिमखान्यात सोमवारी दुपारी १२ वाजता पार पडला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय आणि प्रमूख पाहूणे म्हणून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या माजी अधिष्ठाता डॉ. विभावरी दाणी, डॉ. रवी वानखेडे प्रामुख्याने उपस्थीत होते.
विभागीय प्रत्यारोपण समन्वय केंद्राला २५ वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्त समन्वय केंद्र आणि वाहतुक शाखा पोलिसांच्या संयुक्त विद्यमाने रौप्य महोत्सवी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
शहरातील वाहतूक व्यवस्था आणि वाहतूक पोलिसांबद्दल नेहमीच सर्वत्र चर्चा असते. मात्र, ज्यावेळी एखादी अवयव दुस-याचे प्राण वाचविण्यासाठी बाहेर पाठविला जातो, त्यावेळी सर्व वाहतूक पोलीस एकत्र येऊन मिशन ग्रीन कॉरिडोरची एक विशेष व्यवस्था करतात. कमीत कमी वेळेत एखाद्या व्यक्तीचा अवयव प्रत्यारोपण करण्यासाठी एका शहरातील हॉस्पिटल मधून दुस-या शहरातील हॉस्पीटलमध्ये न्यायचा असतो. अशा वेळी वाहतुक पोलीस अक्षरश: सर्व सिग्नल स्वत: नियंत्रीत करून कमीत कमी वेळेत कुणाचा जीव वाचविण्याची अत्यंत महत्वाची जबाबदारी हिरीरिने पार पाडत असतात. तो प्रसंग आमच्यासाठी खूपच अभिमानास्पद असल्याचे पोलीस आयुक्त डॉ. उपाद्याय म्हणाले. अवयव दानाची सविस्तर माहिती पोलिसांना मिळावी आणि त्याची अवयवदानाच्या मोहिमेची व्यापक जनजागृती व्हावी यासाठी सदर कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याचे यावेळी उपायुक्त गजानन शिवलिंग राजमाने यांनी स्पष्ट केले. डॉ. विभावरी दाणी यांनी अवयव प्रत्यारोपणाबाबत सविस्तर माहिती दिली. कोणता अवयवाचे किती वेळेत प्रत्यारोपण केले जावू शकतात याबाबतही त्यांनी सविस्तर माहिती दिली. कार्यक्रमाचे संचालन आणि आभार प्रदर्शन पोलीस उपनिरीक्षक मंगला हरडे यांनी केले.


Web Title: In Nagpur 115 police took resolution to organ donate
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.