राजकीय कृतज्ञतेपोटी माय मराठीकडे कानाडोळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:21 IST2021-01-08T04:21:04+5:302021-01-08T04:21:04+5:30
प्रवीण खापरे / लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : शासनाचे कान टोचणे, हे साहित्यिकांचे काम आहे. मराठीबाबत साहित्य महामंडळाची ही ...

राजकीय कृतज्ञतेपोटी माय मराठीकडे कानाडोळा
प्रवीण खापरे / लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शासनाचे कान टोचणे, हे साहित्यिकांचे काम आहे. मराठीबाबत साहित्य महामंडळाची ही जबाबदारी आहे. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करून केवळ राजकीय कृतज्ञतेपोटी मराठी ध्येयधोरणांचा बळी देण्याचा प्रयत्न अ.भा. मराठी साहित्य महामंडळाकडून सुरू असल्याचे स्पष्ट होत आहे.
कोरोनाच्या दीर्घकाळानंतर ४ जानेवारी रोजी महामंडळाच्या पार पडलेल्या बैठकीत स्थळ निवड समितीची स्थापना झाली. त्यात दिल्लीचा पत्ता कट करून ९४व्या अ.भा. मराठी संमेलनासाठी केवळ नाशिकलाच पसंती देण्याची चर्चा सुरू आहे. महाराष्ट्र स्थापनेच्या हीरक महोत्सवी वर्षाप्रीत्यर्थ कुसुमाग्रजांना आदरांजली वाहण्याचा हा विचार असू शकतो. संस्थात्मकदृष्ट्या भावनेपेक्षा धोरणांना जास्त महत्त्व असते. मराठी साहित्य संमेलन महाराष्ट्रात कधीही घेता येईल. परभाषिक मुलखात, तेही दिल्लीत क्वचितच संधी असेल. मिळालेली ती संधी केवळ राजकीय कृतज्ञतेपोटी दवडली जात असल्याचे स्पष्ट होत आहे. हीरक महोत्सवी वर्षानिमित्त मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळणे, मराठी विद्यापीठ स्थापन होणे आदी प्रलंबित मागण्यांना केंद्र दरबारी बळ देण्याची ही संधी महत्त्वाची मानली जात होती. नागपुरात महामंडळाचे कार्यालय असताना मराठीच्या विकासासाठी राजकीय वर्चस्व डावलण्याचे सर्वतोपरी प्रयत्न झाले आणि धोरणात्मक निर्णयांना प्राधान्य देण्यात आले. मात्र, महामंडळाचे कार्यालय औरंगाबादकडे हस्तांतरित होताच, ध्येयधोरणांना केराची टोपली दाखवण्यात आल्याचे वेळोवेळी दिसून येते.
महाराष्ट्राबाहेर झालेली संमेलने
आतापर्यंत अ.भा. मराठी साहित्य संमेलने १७ वेळा महाराष्ट्राबाहेर झाली आहेत. त्यात बडोदे : अहमदाबाद - गुजरात, इंदूर : ग्वाल्हेर : भोपाळ - मध्यप्रदेश, रायपूर - छत्तीसगड, हैदराबाद - आंध्रप्रदेश (तेलंगणा), पणजी - गोवा, घुमान - पंजाब आणि दिल्ली या स्थळांचा समोवश आहे. अहमदाबाद, पणजी, रायपूर, घुमान आणि दिल्ली वगळता इतर ठिकाणी एकापेक्षा जास्तवेळा ही संमेलने झाली आहेत.
संमेलनाची दिल्ली मोहीम गरजेची
१९५४ साली दिल्ली येथे ३७वे साहित्य संमेलन झाले होते. तेव्हा संयुक्त महाराष्ट्र अस्तित्वात आले नव्हते. त्यामुळे, केंद्रापुढे महाराष्ट्राच्या हीरक महोत्सवी वर्षानिमित्त मराठी भाषेबाबत अनेक मागण्यांना प्रत्यक्ष बळ देण्याची आणि महाराष्ट्र संघटित असल्याचे दाखविण्याची संधी होती. मात्र, राजकीय इच्छेपुढे महामंडळ हतबल असल्याचे स्पष्ट होत आहे.
हवे तर भुजबळ, टकले यांनीच नेतृत्व स्वीकारावे
पवार साहेब गर्जा महाराष्ट्रच्या भीमथडीचे नेतृत्व करतात. साहित्य, कला आधारवडीच्या बाबतील यशवंतरावांनंतर पवार साहेबांचेच नाव पुढे येते. विरोधकही त्यांना मानतात. पंतप्रधान मोदी यांनाही त्यांच्याबाबत सन्मान आहे. संमेलनाच्या निमित्ताने दिल्लीत महाराष्ट्र संघटित आहे, हे सिद्ध करता येणार आहे आणि मराठी बतचे अनेक प्रश्न थेट सोडवता येणार आहेत. हवे तर महाराष्ट्र सरकारने आम्हाला अनुदानाचा पैसा देऊ नये. छगन भुजबळ आणि हेमंत टकले यांनी संमेलनाचे नेतृत्व करावे आणि पवार साहेबांना स्वागताध्यक्ष. मात्र, ९४वे संमेलन दिल्लीत व्हावे, अशी आमची इच्छा आहे.
- संजय नाहर, संस्थापक - सरहद