Murder of a youth on a loan of two thousand in Nagpur | नागपुरात दोन हजारांच्या उधारीवरून तरुणाची हत्या

नागपुरात दोन हजारांच्या उधारीवरून तरुणाची हत्या

ठळक मुद्देमित्रांनीच केला घात : गुन्हे शाखेने लावला छडा

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : अवघ्या दोन हजाराच्या उधारीतून वाद निर्माण झाल्याने तिघांनी एका तरुणाची हत्या करून त्याचा मृतदेह विहिरीत फेकून दिला. या हत्येच्या गुन्ह्याची माहिती मिळाल्यानंतर मृत किंवा आरोपींबाबत कसलीही माहिती नसतानादेखील गुन्हे शाखा युनिट तीनच्या पथकाने या हत्याकांडाचा छडा लावून आरोपींना अटक करण्यात यश मिळवले. गुन्हे शाखेचे उपायुक्त गजानन शिवलिंग राजमाने यांनी आज पत्रकारांना ही माहिती दिली. यावेळी सहायक आयुक्त सुधीर नंदनवार आणि तपास पथक प्रमुख नरेंद्र हिवरे हजर होते.
कामठी मार्गावर नोवाटेल हॉटेल आहे. त्याच्या बाजूला नाल्याजवळ झुडूपात एक मृतदेह पडून असल्याची माहिती हॉटेलच्या सिक्युरिटी गार्डने जुना कामठी ठाण्यातील पोलिसांना १४ ऑगस्टच्या सकाळी ९ वाजता कळविली. पोलीस तेथे पोहचले. मात्र, तत्पूर्वीच तेथून तो मृतदेह हटविण्यात आला होता. पोलिसांनी चौकशी केली असता तेथे रक्ताचे डाग, दगड अन् कपडे आढळले. पोलिसांनी आजूबाजूचा परिसर पिंजून काढला असता खैरी शिवारातील एका विहिरीत एक मृतदेह आढळून आला. दगडाने ठेचून त्या तरुणाची हत्या करण्यात आल्याचे डॉक्टरांनी पोलिसांना सांगितले. त्यावरून हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला. मृताबाबत इकडे तिकडे चौकशी करूनही त्याची ओळख पटली नाही. त्यामुळे या हत्याकांडाचा तपास करणे पोलिसांसाठी आव्हान ठरले. पोलिसांनी हॉटेल परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता त्यात एका ऑटोरिक्षा जाताना दिसली. इमेज फारच अस्पष्ट होती मात्र तो ऑटो बजाज मॅक्झिमा सारखा नवीन असल्याचे दिसत होते. तो धागा पकडून पोलिसांनी बजाज मॅक्झिमा ऑटो विकणाऱ्या वितरकांकडे जाऊन १ जानेवारी ते १३ जुलै २०१९ दरम्यान कुणाकुणाला ऑटो विकले त्याची माहिती काढली. या कालावधीत एकूण ७४९ ऑटो विकण्यात आल्याचे कळाल्याने युनिट तीन मधील १५ पोलिसांना प्रत्येकी ५० ऑटोचालकांची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले. त्यातून आरोपी ऑटोचालक महेश ऊर्फ मुकेश भय्यालाल खरे (वय २९, रा. राजीव गांधीनगर, जुना कामठी) याने मृताचे नाव शेख माजिद ऊर्फ मतिन कुल्फीवाला असल्याचे सांगून तो फुकटनगरातील रहिवासी असल्याचे सांगितले. दोन हजार रुपयाच्या उधारीसाठी त्याने तगादा लावल्याने त्याची दोन साथीदारांच्या मदतीने हत्या केल्याची कबुली दिली.
त्यावरून पोलिसांनी खरे तसेच त्याचा साथीदार शेख सलमान अब्दुल रहिम शेख (वय २५, रा. येरखेडा) यालाही अटक केली. त्यांचा एक साथीदार फरार असून आम्ही त्यालाही लवकरच अटक करू, असा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला.
आयुक्तांनी दिला ८० हजारांचा रिवॉर्ड !
मृत मतिन अकोला जिल्ह्यातील तेल्हारा (मालेगाव) येथील रहिवासी होता. तो येथे एकटाच राहायचा अन् कुल्फी विकून उदरनिर्वाह करायचा. त्यामुळे त्याची हत्या झाल्यानंतर आरोपी वगळता कुणालाही त्याची माहिती नव्हती. पोलिसांनी त्याची ओळख पटविण्यासाठी संगणकाच्या साहाय्याने मतिनचे चित्र बनवून त्याचे फ्लेक्स तयार केले आणि ते जागोजागी लावले. मात्र, मतिनची कुणी ओळख पटवली नाही. तरीसुद्धा एका ऑटोवरून पोलिसांनी या हत्याकांडाचा उलगडा केला. पोलीस निरीक्षक नरेंद्र हिवरे, सहायक निरीक्षक पंकज धाडगे, योगेश चौधरी, एएसआय राजेंद्र बघेल, रफिक खान, हवलदार शत्रुघ्न कडू, अनिल दुबे, शैलेश पाटील, अरुण धर्मे, अतुल दवंडे, शाम कडू, प्रवीण गोरटे, राकेश यादव, टप्पूलाल चुटे, परवेज शेख, संदीप मावळकर, सूरज शिंगणे, राजू पोतदार, शेख फिरोज, शेख शरिफ आणि सत्येंद्र यादव यांनी ही कामगिरी बजावली. याच पथकाने यापूर्वी कळमना, गणेशपेठ, जरीपटका आणि आता या गंभीर गुन्ह्याची उकल केली. त्यामुळे पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी या पथकाला ८० हजारांचा रिवॉर्ड घोषित केला.

 

Web Title: Murder of a youth on a loan of two thousand in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.