अनाेळखी व्यक्तीची हत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2021 04:09 IST2021-04-01T04:09:16+5:302021-04-01T04:09:16+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क बुटीबाेरी : अज्ञात आराेपीने एका अनाेळखी व्यक्तीची दगडाने ठेचून हत्या केली. दरम्यान, बुधवारी (दि.३१) सकाळी १० ...

अनाेळखी व्यक्तीची हत्या
लाेकमत न्यूज नेटवर्क
बुटीबाेरी : अज्ञात आराेपीने एका अनाेळखी व्यक्तीची दगडाने ठेचून हत्या केली. दरम्यान, बुधवारी (दि.३१) सकाळी १० वाजताच्या सुमारास बाेरखेडी फाटक परिसरात सदर अनाेळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याने ही घटना उघडकीस आली.
अशाेक विठ्ठल वंजारी (४३, रा. वाॅर्ड क्र. ४, इंदिरानगर, बुटीबाेरी) यांचा चुलत भाऊ सुरेश वंजारी हे बाेरखेडी फाटक परिसरातील रेल्वे पटरीलगत असलेल्या पुलाखाली साचलेल्या पाण्यात बैलांना पाणी पाजायला गेले असता, त्यांना एका अनाेळखी व्यक्तीचा मृतदेह रक्ताच्या थाराेळ्यात पडून असल्याचे आढळले. ही बाब त्यांनी लगेच अशाेक वंजारी सांगून पाेलिसांना सूचना दिली. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पाेलीस अधिकारी राजेंद्र चाैहान, ठाणेदार ओमप्रकाश काेकाटे, एपीआय सतीश साेनटक्के यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला.
मृत व्यक्ती अंदाजे ३० ते ३५ वर्षे वयाेगटातील असून, उंची साडेपाच फूट, अंगात जांभळ्या रंगाचा टी-शर्ट, कथ्था राखडी रंगाचा लाेअर पॅन्ट परिधान केला असून, त्याच्या उजव्या हातावर ‘ओम’ असे गाेंदलेले आहे. मृताच्या हातात गाेल तांब्याचे कडे असून, डाेक्यावरील केस रक्ताने माखलेले हाेते. पाेलिसांनी परिसरात पाहणी केली असता, १० ते १२ किलाे वजनाचे तीन दगड रक्ताने माखलेले आढळून आले. यावरून सदर अनाेळखी व्यक्तीचा आराेपीने दगडाने ठेचून खून केल्याचे स्पष्ट हाेते, अशी माहिती पाेलीस अधिकाऱ्यांनी दिली. पाेलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीसाठी पाठविला. याप्रकरणी बुटीबाेरी पाेलिसांनी भादंवि कलम ३०२ अन्वये गुन्हा नाेंदविला असून, पुढील तपास सहायक पाेलीस निरीक्षक माणिक चाैधरी करीत आहेत.