सक्करदऱ्यात गुंडाची हत्या

By Admin | Published: September 10, 2016 02:09 AM2016-09-10T02:09:09+5:302016-09-10T02:09:09+5:30

सक्करदऱ्यातील कुख्यात गुंड आशिष संजय राऊत (वय २४) याची तीन ते चार जणांनी चाकूचे सपासप घाव घालून निर्घृण हत्या केली.

Murder of punk in succession | सक्करदऱ्यात गुंडाची हत्या

सक्करदऱ्यात गुंडाची हत्या

googlenewsNext

नंदनवनमध्ये हत्येचा प्रयत्न : उपराजधानीत थरार
नागपूर : सक्करदऱ्यातील कुख्यात गुंड आशिष संजय राऊत (वय २४) याची तीन ते चार जणांनी चाकूचे सपासप घाव घालून निर्घृण हत्या केली. खंडणी वसुलीमुळे त्रस्त झाल्यामुळे आरोपींनी कुख्यात राऊतची हत्या केली. दुसरीकडे सुदेश ऊर्फ मायकेल दिनेश राऊत (वय २४) नामक गुंडावर एका बुकी आणि त्याच्या साथीदारांनी प्राणघातक हल्ला चढवून त्याला गंभीर जखमी केले. केवळ एका तासाच्या अंतराने शुक्रवारी दुपारी ३ ते ३.३० या वेळेत वर्दळीच्या सक्करदरा आणि नंदनवन भागात या घटना घडल्या. त्यामुळे शहरात थरार निर्माण झाला आहे.

आशिष राऊत याच्यावर सचिन गावंडे आणि गायकवाड या दोघांची हत्या, हत्येचा प्रयत्न यासह एक डझनपेक्षा जास्त गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याची सक्करदरा आणि आजूबाजूच्या परिसरात प्रचंड दहशत होती. तो दिवसाढवळ्या शस्त्राच्या जोरावर खंडणी वसुली करायचा. एकाच दुकानदाराला नेहमी खंडणी मागायचा. छोटे दुकानदार त्याच्यापासून त्रस्त होते. त्यामुळे त्याला तडीपारही करण्यात आले होते.
दीड महिन्यापूर्वीच तो तडीपारी संपवून शहरात परतला अन् पुन्हा त्याने भाईगिरी सुरू केली. शुक्रवारी दुपारी ३ च्या सुमारास तो हैदरखान सोबत कमला नेहरू महाविद्यालयाजवळच्या बुधवारी बाजारात अ‍ॅव्हेंजरने आला.

राऊत करीत होता हप्ता वसुली
नागपूर : सिनेमातील गुंडाप्रमाणे त्याने आपली दुचाकी उभी करून शिवीगाळ करीत हप्ता वसुली सुरू केली. त्यामुळे आधीच चिडून असलेल्या सारंग नरेश पुट्टेवार (३५), त्याचा भाऊ ऋषी, शंकर गणपतराव शिरपूरकर (४२) आणि अन्य काही जणांनी कुख्यात राऊतवर भाजी कापण्याचा चाकूने हल्ला चढवला. ते पाहून त्याचा साथीदार हैदर पळून गेला. सणोत्सवाचे दिवस असल्याने बुधवारी बाजारात आज मोठी वर्दळ होती. शेकडो लोकांसमोर ही घटना घडल्याने बाजारात प्रचंड थरार निर्माण झाला. अनेकांनी आपली दुकाने बंद केली. माहिती कळताच सक्करदरा पोलिसांचा ताफा घटनास्थळी धावला. गुन्हेशाखेचे पथकही घटनास्थळी पोहचले. पोलिसांनी धावपळ करून सारंग आणि शंकरला ताब्यात घेतले.

पोलिसांदेखतही आरोपीने केले वार
दिवसभर राबराब राबून दोन वेळेची भाजीभाकर कमविणाऱ्या छोट्या छोट्या दुकानदारांना कुख्यात आशिष राऊत खंडणीसाठी छळत होता. त्याच्या अत्याचारामुळे या भागातील दुकानदारांच्या मनात राऊतबद्दल कमालीचा रोष होता. आज या रोषाचा भडका उडाला.एकाने हिंमत दाखवून राऊतवर वार करताच बाकीचेही तुटून पडले. आरोपींनी राऊतला बचावाची कसलीही संधी दिली नाही. राऊतचा गेम होत असताना या भागातील गस्तीवरील दोन पोलीस (चार्ली) तेथे पोहचले. त्यांना पाहून काही आरोपी पळाले. मात्र, एक जण पोलिसांसमोरही राऊतवर घाव घालत राहिला.
पोलीस आयुक्तांनी घेतली दखल
हत्या आणि हत्येच्या या घटनांची पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम यांनी गंभीर दखल घेतली. त्यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्याचे आदेश देतानाच नागपूरकरांनाही आवाहन केले. कोणत्याही गुंडाने खंडणी मागितल्यास ताबडतोब नजिकचे पोलीस ठाणे, पोलीस उपायुक्त, नियंत्रण कक्ष किंवा थेट माझ्याकडे (पोलीस आयुक्तालयात) माहिती द्या. माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवून संबंधित गुंडावर कठोर कारवाई केली जाईल, असे त्यांनी म्हटले.

बुकीने घातले गुंडावर घाव
सक्करदऱ्यात राऊतच्या हत्येने थरार निर्माण केला असतानाच दुपारी ३ ते ३.३० च्या सुमारास बाजूच्या नंदनवन-खरबी मार्गावर सुदेश ऊर्फ मायकेल दिनेश राऊत (वय २४, रा. खरबी) याच्यावर सट्टेबाजीत गुंतलेल्या गुंडांनी हल्ला चढवला. त्यामुळे कुख्यात सुदेश गंभीर जखमी झाला असून, तो कोमात आहे.
कुख्यात सुदेश राऊत महिन्याभरापूर्वीच कारागृहातून बाहेर आला होता. आरोपी इब्राहिम खान हा बुकी असून, तो व्याजानेही पैसे वाटतो. वर्षभरापूर्वी त्याच्याकडून सुदेशने एक लाख रुपये घेतले होते. कारागृहातून परतल्यानंतर इब्राहिम सुदेशला पैसे परत मागत होता. त्यावरून या दोघांमध्ये गुरुवारी दुपारी हसनबागमध्ये वाद झाला. यावेळी सुदेशने इब्राहिमला बेदम मारहाण केली. त्यामुळे तो आणि त्याचे साथीदार सुदेशला धडा शिकविण्याच्या तयारीत होते. शुक्रवारी दुपारी सुदेश आणि त्याचा मित्र इर्शाद हे खरबीतील एका पानटपरीवर उभे असताना आरोपी इब्राहिम, त्याचा भाचा सलीम तसेच अली आणि आणखी पाच साथीदार सुदेशवर चालून आले. आरोपींनी घातक शस्त्राने सुदेशच्या पार्श्वभागावर घाव घातले. जीवाच्या धाकाने सुदेश समोरच्या घरात पळाला. आरडाओरडा ऐकून आजूबाजूची मंडळी धावल्यामुळे आरोपी पळून गेले. अत्यवस्थ अवस्थेत सुदेशला इर्शादने रुग्णालयात नेले. मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्याने तो कोमात गेला. दरम्यान, या घटनेची माहिती कळताच नंदनवनचे ठाणेदार सुनील महाडिक आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी पोहचले. तोपर्यंत घटनास्थळी प्रचंड तणाव निर्माण झाला होता. त्यांनी धावपळ करून आरोपी इब्राहिम, सलीम आणि लल्लाला ताब्यात घेतले.

Web Title: Murder of punk in succession

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.