विवाहित महिलेची हत्या की आत्महत्या?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2021 04:08 IST2021-05-30T04:08:17+5:302021-05-30T04:08:17+5:30
वानाडोंगरी : हिंगणा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या व्याहाड येथे सार्वजनिक विहिरीत शुक्रवारी मध्यरात्री १ वाजतादरम्यान विवाहित महिलेचा मृतदेह आढळला. ...

विवाहित महिलेची हत्या की आत्महत्या?
वानाडोंगरी : हिंगणा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या व्याहाड येथे सार्वजनिक विहिरीत शुक्रवारी मध्यरात्री १ वाजतादरम्यान विवाहित महिलेचा मृतदेह आढळला. माधुरी कुबडे (३०) रा. व्याहाड असे मृत महिलेचे नाव आहे. याबाबत पोलिसांना माहिती दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह विहिरीबाहेर काढून उत्तरीय तपासणीसाठी हिंगणा येथील ग्रामीण रुग्णालयात रवाना केला. मृत महिलेचा पती सुभाष कुबडे यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी मृत्यूची नोंद केली आहे. मात्र महिलेच्या माहेरच्या मंडळीने ही आत्महत्या नसून हत्या असल्याचा आरोप केला आहे.
मृत महिलेचे पती सुभाष कुबडे यांच्यानुसार रात्री ९.३० वाजतादरम्यान जेवण करून दोन्ही मुली व पती-पत्नी झोपी गेले. मात्र रात्री १२ वाजताच्या सुमारास कुबडे हे लघुशंकेसाठी उठले असता त्यांना पत्नी माधुरी झोपलेली दिसली नाही. त्यांनी आजूबाजूला सांगून सगळीकडे शोध घेतला. परंतु काही मंडळींनी सार्वजनिक विहिरीत शोध घेतला असता मृतदेह आढळून आला. याची माहिती कुबडे यांना देण्यात आली. हिंगणा पोलिसांनी मृत्यूची नोंद केली आहे. मात्र मृत महिलेचे माहेरकडील मंडळीने ही आत्महत्या नसून हत्या असल्याचा आरोप केला आहे. यासंदर्भात हिंगणा ठाण्याचे पोलीस निरीक्षक सारिन दुर्गे यांना विचारणा केली असताना प्राथमिक तपासणीत हत्येचे कुठेही कारण दिसून आले नसल्याचे सांगितले. मात्र शवविच्छेदनानंतर पुढील बाबी स्पष्ट होतील, असे दुर्गे यांनी सांगितले. घटनेचा तपास हेड कॉन्स्टेबल विशाल तोडासे करीत आहेत.