अनैतिक संबंधात अडसर ठरलेल्या पतीची हत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 04:09 IST2021-02-13T04:09:37+5:302021-02-13T04:09:37+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : अनैतिक संबंधात अडसर ठरलेल्या पतीची पत्नीने प्रियकराच्या मदतीने हत्या केली. नंतर त्याचा स्वाभाविक मृत्यू ...

अनैतिक संबंधात अडसर ठरलेल्या पतीची हत्या
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : अनैतिक संबंधात अडसर ठरलेल्या पतीची पत्नीने प्रियकराच्या मदतीने हत्या केली. नंतर त्याचा स्वाभाविक मृत्यू झाल्याचा कांगावा केला. मात्र, वैद्यकीय अहवालानंतर पत्नीचे बिंग फुटले अन् तिला तसेच तिच्या प्रियकराला पोलिसांनी शुक्रवारी बेड्या ठोकल्या. एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हे प्रकरण आहे.
शेखर बब्बू कनोजिया (वय ४७) शारदानगर, एमआयडीसी येथे राहत होता. तो आणि त्याची पत्नी सरिता (वय ३८) प्रेस (लॉन्ड्री) करून उदरनिर्वाह करीत होते. व्यवसाय चांगला चालत असल्याने लोकांचे कपडे आणून नेऊन देण्यासाठी त्यांनी गेल्या वर्षी आरोपी पंकज चंद्रकांत कडू (वय २५, रा. सोनेगाव जुनी वस्ती) याला ठेवून घेतले. वयाने १३ वर्षे लहान असलेल्या पंकजसोबत सरिताचे पाच महिन्यांपूर्वी अनैतिक संबंध जुळले. त्यामुळे शेखरवर वेगवेगळे आरोप लावून सरिता त्याच्याशी वाद घालू लागली. पत्नीची कटकट वाढल्याने आणि तिने भंडावून सोडल्याने शेखर त्याच्या भावाकडे खामला-देवनगरजवळच्या दंतेश्वरीनगरात राहायला गेला. पाच महिन्यांपासून तो तेथेच राहात होता. त्यामुळे सरिता-पंकजला रान मोकळे झाले होते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून शेखर परत आपल्या घरी अधूनमधून येऊ-जाऊ लागला. त्यामुळे सरिता आणि पंकजच्या अनैतिक संबंधात अडसर निर्माण झाला. त्यामुळे हे दोघे अस्वस्थ झाले. त्यांनी शेखरचा काटा काढण्याचा कट रचला. ठरल्याप्रमाणे ७ फेब्रुवारीच्या रात्री शेखर घरी येताच सरिता आणि पंकजने त्याला गोडीगुलाबीने भरपूर दारू पाजली. नंतर त्याला बेदम मारहाण करून त्याची हत्या केली. दुसऱ्या दिवशी सकाळी तो मृत झाल्याचा कांगावा केला. शेखरचा भाऊ सुनील याने पोलिसांना शेखरच्या मृत्यूची सूचना दिली. त्यानंतर वैद्यकीय अहवालात शेखरचा मृत्यू डोक्यावर जबर वार केल्याने झाल्याचे डॉक्टरांनी वैद्यकीय अहवालात नमूद केले. त्यामुळे एमआयडीसीचे ठाणेदार युवराज हांडे, पीएसआय विकास जाधव यांनी सहकाऱ्यांच्या मदतीने सरिता तसेच पंकजच्या हालचालीवर लक्ष केंद्रित केले. संशय पक्का होताच त्यांना शुक्रवारी ताब्यात घेऊन त्यांची चौकशी केली. त्यांनी शेखरच्या हत्येची कबुली दिल्यानंतर या दोघांना अटक करण्यात आली. शनिवारी त्यांना न्यायालयात हजर करून त्यांचा पीसीआर मागितला जाणार आहे.
---
आप्त स्वकीयांनाही जबर धक्का
अनैतिक संबंधात गुरफटलेल्या सरिताला दोन मुली होत्या. त्यातील एकीचा अपघाती मृत्यू झाला तर दुसरीने प्रेमविवाह करून संसार थाटला आहे. सरिताच्या या कृत्यामुळे तिच्या, शेखरच्या कुटुंबीयांना आणि आप्त स्वकीयांनाही जबर धक्का बसला आहे.
---