नागपुरात दारूच्या नशेत आरोपीकडून सहकाऱ्याची निर्घृण हत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2018 00:32 IST2018-03-20T00:32:22+5:302018-03-20T00:32:35+5:30
क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादानंतर दारूच्या नशेत टुन्न असलेल्या आरोपीने आपल्याच सहकाऱ्याची निर्घृण हत्या केली. यशोधरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत रविवारी रात्री ११ च्या सुमारास ही थरारक घटना घडली.

नागपुरात दारूच्या नशेत आरोपीकडून सहकाऱ्याची निर्घृण हत्या
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादानंतर दारूच्या नशेत टुन्न असलेल्या आरोपीने आपल्याच सहकाऱ्याची निर्घृण हत्या केली. यशोधरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत रविवारी रात्री ११ च्या सुमारास ही थरारक घटना घडली. मोहम्मद जुबेर (वय अंदाजे ४५ वर्षे) असे मृताचे नाव आहे.
जुबेर बिहार प्रांतातील दरभंगा जिल्ह्यात राघोपूर येथील रहिवासी होय. या गावात कपड्यावर कलाकुसर करणारांची मोठी संख्या आहे. तेथून रोजगाराच्या शोधात आलेले अनेक जण नागपुरात स्थिरावले आहेत. आरोपी मोहम्मद आलमगिर मोहम्मद दिसा शेख (वय ३०) आणि मोहम्मद जुबेर सहा महिन्यांपूर्वी नागपुरात आले. प्रारंभी जुबेर आजरी माजरी परिसरात एका व्यापाऱ्याकडे कपड्यावर कलाकुसर करायचा. दोन आठवड्यांपूर्वी त्याचे तेथून काम सुटले. त्यामुळे गावातील अन्य कारागिरांच्या ओळखीने तो यशोधरानगरातील निजामुद्दीन कॉलनीत राहायला आला. आरोपी आलमगिर आणि जुबेर हे मोहम्मद आलम मोहम्मद इस्लाम शहा (वय ३४) यांच्याकडे भाड्याने राहायचे. दोघांनाही दारूचे व्यसन होते. रोज दारू पिऊन रात्रीचे जेवण घेतल्यानंतर जुबेर गावातील ओळखीच्यांकडे बाजूला झोपायला जायचा. नेहमीप्रमाणे रविवारी रात्री ११ च्या सुमारास जुबेर बाजूच्या व्यक्तीकडे गेला. तेथे आरोपी आलमगिरही आला. दारूच्या नशेत तेथे दोघांत वाद झाला. त्यांनी एकमेकांना मारहाण केली. यावेळी आरोपी आलमगिरने टोकदार शस्त्राने जुबेरच्या छातीवर घाव घातले आणि पळून गेला. जखमी अवस्थेत जुबेर घरासमोर उभा असताना घरमालक मोहम्मद आलम बाहेरून आले. त्याच्या छातीतून रक्त निघत असल्याचे पाहून आलम यांनी त्याला विचारणा केली. यावेळी आलमगिरने मारल्याचे सांगून जुबेर खाली कोसळला. आलम यांनी शेजाऱ्यांच्या मदतीने जुबेरला मेयो हॉस्पिटलमध्ये नेले. तेथे डॉक्टरांनी जुबेरला मृत घोषित केले.
पोलिसांसोबत लपंडाव
आरोपी आलमगिर हा गुन्हेगारी वृत्तीचा असून तो रविवारी रात्रीपासून पोलिसांसोबत लपंडाव खेळत आहे. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी गेल्यानंतर तो काही वेळेसाठी आपला मोबाईल बंद करून ठेवतो. त्याचे लास्ट लोकेशन पाहून पोलीस ज्या ठिकाणी पोहचतात, तेथून तो कधीचाच सटकलेला असतो. पोलिसांची वेगवेगळी पथके त्याचा शोध घेण्यासाठी धावपळ करीत आहेत. वृत्त लिहिस्तोवर आरोपी पोलिसांना सापडला नव्हता.
---