प्रभाग पद्धतीने होणार मनपाची निवडणूक !

By Admin | Updated: August 9, 2015 02:28 IST2015-08-09T02:28:27+5:302015-08-09T02:28:27+5:30

राज्यातील महापालिकेच्या आगामी निवडणुका प्रभाग पद्धतीनेच होतील, असे संकेत मिळाले आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार यासाठी निवडणूक आयोगाने तयारी सुरू केली आहे.

Municipal election will be held in ward wise! | प्रभाग पद्धतीने होणार मनपाची निवडणूक !

प्रभाग पद्धतीने होणार मनपाची निवडणूक !

निवडणूक आयोगाची तयारी सुरू : १२ रोजी प्रभाग रचनेवर मंथन
नागपूर : राज्यातील महापालिकेच्या आगामी निवडणुका प्रभाग पद्धतीनेच होतील, असे संकेत मिळाले आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार यासाठी निवडणूक आयोगाने तयारी सुरू केली आहे. मात्र, एका प्रभागात किती वॉर्डांचा समावेश केला जाईल, यावर अद्याप काहीही स्पष्ट करण्यात आलेले नाही. तयारीचा एक भाग म्हणून निवडणूक आयोगाने नागपूरसह कोकण, पुणे, अमरावती, औरंगाबादच्या विभागीय आयुक्तांना पत्र पाठवून तयारीच्या आढाव्यासाठी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमध्ये सहभागी होण्याचे निर्देश दिले आहेत.
राज्य निवडणूक आयोगाचे अवर सचिव नि.ज. वागळे यांच्यातर्फे ७ आॅगस्ट रोजी विभागीय आयुक्तांच्या नावे पत्र पाठविण्यात आले आहे. २०१६-१७ मध्ये १० महापालिका, १९५ नगर परिषद- नगर पंचायत, २६ जिल्हा परिषद तसेच २९७ पंचायत समित्यांच्या निवडणूक तयारीचा आढावा घेतला जाईल. प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या तयारीवर चर्चा केली जाईल. निवडणूक तयारीबाबत पहिली व्हिडिओ कॉन्फरन्स १२ आॅगस्ट रोजी सकाळी ११ वाजता होत आहे. बैठकीत सर्व विभागीय आयुक्त कार्यालयांशिवाय संबंधित जिल्हाधिकारी कार्यालय व पुणे महापालिका कार्यालय, एमएसडब्ल्यूएएन हेल्पडेस्क, नवीन प्रशासनिक भवन मंत्रालयाचे कार्यालय जोडले जाईल.
बैठकीत विभागीय आयुक्तांसह जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपरिषद निवडणुकीचे काम पाहणारे उपायुक्त उपस्थित राहतील. संबंधित महापालिकांचे आयुक्त, निवडणूक काम पाहणारे उपायुक्तही उपस्थित राहतील. (प्रतिनिधी)
महाआॅनलाईनच्या सॉफ्टवेअरच्या
आधारावर प्रभाग रचना

डिसेंबर २०१६ पासून मार्च २०१७ दरम्यान ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांचा कार्यकाळ पूर्ण होत आहे, त्यांची प्रभाग रचना महाआॅनलाईनतर्फे विकसित सॉफ्टवेअरच्या आधारावर केली जाईल. २०११ च्या गुगल मॅपच्या आधारावर जनगणना प्रगणक गट तयार करून ३१ आॅगस्ट २०१५ पर्यंत महाआॅनलाईनकडे प्रारूप प्रभाग रचना पाठवायची आहे. त्यानंतरच प्रभाग रचना कशी असेल हे स्पष्ट होईल.
वॉर्डपद्धतीचा अपेक्षाभंग
गोंदिया-भंडारा जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपला पराभवाला सामोरे जावे लागले. याचा भाजपने जोरदार धसका घेतला. यामुळेच आता वॉर्ड पद्धतीने निवडणूक घेण्याचा घेतलेला निर्णय बाजूला ठेवण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. भाजपचे ज्येष्ठ नेते प्रभाग पद्धतीने निवडणूक घेण्याचे समर्थन करीत आहेत. त्यांनी आपल्या भावना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत पोहचविल्या आहेत. वॉर्ड आधारावर निवडणूक झाली तर अपक्षांना फायदा होतो. मात्र प्रभाग पद्धतीने निवडणूक झाली तर अनेकांचा अपेक्षाभंग होणार आहे.

Web Title: Municipal election will be held in ward wise!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.