नायलॉन मांजा देऊन करणार मनपा आयुक्त मुंढे यांचे स्वागत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2020 11:01 PM2020-01-24T23:01:33+5:302020-01-24T23:03:55+5:30

महापालिकेचे नवे आयुक्त तुकाराम मुंढे यांचे आगमन झाल्यानंतर त्यांचे नायलॉन मांजा देऊन स्वागत करण्याचा निर्धार पक्षिप्रेमींनी केला आहे.

Municipal Commissioner Mundhe will welcome by giving the nylon manza | नायलॉन मांजा देऊन करणार मनपा आयुक्त मुंढे यांचे स्वागत

नायलॉन मांजा देऊन करणार मनपा आयुक्त मुंढे यांचे स्वागत

Next
ठळक मुद्देपक्षिप्रेमी, पर्यावरणप्रेमींचे अनोखे साकडे : बंदीवर कठोर अंमलबजावणीची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महापालिकेचे नवे आयुक्ततुकाराम मुंढे यांचे आगमन झाल्यानंतर त्यांचे नायलॉन मांजा देऊन स्वागत करण्याचा निर्धार पक्षिप्रेमींनी केला आहे. कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून प्रसिद्ध असलेल्या मुंढे यांनी नायलॉन मांजाच्या बंदीची कठोरपणे अंमलबजावणी करावी आणि मकरसंक्रांतीपूर्वी विक्रीसाठी मांजा आणणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी या अनोख्या आंदोलनाच्या माध्यमातून केली जाणार असल्याची माहिती पर्यावरण व पक्षिप्रेमी डॉ. अभिक घोष यांनी दिली.
पतंगोत्सवादरम्यान नायलॉन मांजाच्या खरेदी विक्रीवर बंदी असूनही नेहमीप्रमाणे यावर्षीही सर्रासपणे मोठ्या प्रमाणात या जीवघेण्या नायलॉन मांजाची विक्री झाली आणि उपयोगही झाला. त्याचे हवे ते परिणाम दिसून आले असून एकिकडे १५० च्यावर नागरिकांना गंभीर दुखापत झाली तर दुसरीकडे शेकडो पक्ष्यांनी प्राण गमावले व शेकडो जायबंदी झाले होते. महापालिका, पक्षिप्रेमी व पर्यावरण प्रेमी आणि विविध सामाजिक संघटनांच्या जनजागृतीमुळे मांजा वापराचे प्रमाण काही अंशी कमी झाले असले तरी अद्याप बराच बदल होणे अपेक्षित आहे. डॉ. घोष यांनी सांगितले की, मकरसंक्रांतीपूर्वी आम्ही मनपा आयुक्तांनी नायलॉन मांजाच्या बंदीची कठोर अंमलबजावणी करावी यासाठी प्रयत्न करीत होतो. मात्र उत्सवाच्या चार महिन्याआधीच मांजाची खेप शहरात दाखल झाली होती. त्यामुळे त्याची विक्रीही मोठ्या प्रमाणात झाली. बंदी असूनही वापर झाला आणि गंभीर परिणाम दिसून आले.
डॉ. घोष म्हणाले की, दरवेळी असे होत असते. वर्षभर याकडे दुर्लक्ष केले जाते आणि ऐनवेळी संक्रांतीचा उत्सव आला की कारवाईचा फार्स केला जातो. तोपर्यंत शहरात अनधिकृतपणे मांजाची खेप येऊन दाखल होते आणि सर्रासपणे विक्रीही होते. त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी प्रशासनही हतबल ठरते. त्यामुळे निदान पुढच्या वर्षी तरी हा प्रकार होऊ नये म्हणून आताच लक्ष देणे आवश्यक असल्याचे डॉ. घोष म्हणाले. त्यासाठी पक्षिप्रेमी व पर्यावरण प्रेमींकडून स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली असून स्वाक्षऱ्यांचे निवेदनही मनपा आयुक्तांना देण्यात येणार आहे. ही योजना आधीच तयार करण्यात आली होती आणि नुकतेच तुकाराम मुंढे यांना आयुक्त म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. मुंढे हे कठोर कर्तव्यदक्ष अधिक म्हणून ओळखले जात असल्याचे सांगण्यात येते, त्यामुळे नायलॉन मांजाच्या प्रकरणात आम्ही त्यांना आग्रह करणार असल्याचे डॉ. घोष यांनी स्पष्ट केले.

१२ बॅग मांजा केला गोळा
अँग्री बर्ड ऑफ नागपूर या बॅनरखाली विविध सामाजिक संस्था, संघटनांतर्फे पतंगोत्सवानंतर झाडांवर, विद्युत तारांवर अडकलेला मांजा काढण्यासाठी अभियान राबविण्यात आले. या अभियानात ग्रोविल फाऊंडेशन, बकुळा फाऊंडेशन, मॅट्रिक्स वॉरियर्स, आरईईएफ, सीएजी, आय-क्लीन नागपूर, यशोधारा, सेव्ह भरतवन टीम आदी संघटना तसेच वन विभागाचे कर्मचारी, डॉक्टर्स, इंजिनिअर्स, पक्षिप्रेमी, पर्यावरणप्रेमी, पर्यावरणवादी, प्राणीमित्र, सर्पमित्र यांनी सहभाग घेतला होता. अशा २०० च्यावर पक्षिमित्रांनी भरतवन, एम्प्रेसवन, सोनेगाव, वसंतराव नाईक वस्ती, अमरावती रोड, अंबाझरी उद्यान, बजेरिया, तकिया वस्ती धंतोली, खामला, रेशीमबाग, पारडी वस्ती आदी भागात अभियान राबवून अथक प्रयत्नांनी १२ बॅग्स मांजा काढला. हा गोळा झालेला मांजा मनपा आयुक्तांच्या स्वाधीन करण्यात येणार असल्याचे डॉ. घोष यांनी स्पष्ट केले.

Web Title: Municipal Commissioner Mundhe will welcome by giving the nylon manza

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.