ठळक मुद्देदीक्षाभूमीवर सोयीसुविधा : ९७० शौचालये : १०० स्नानगृहे : २०२ अस्थायी नळ : आयुक्त अभिजित बांगर यांनी घेतला आढावा

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : १९५६ च्या धम्मक्रांतीची साक्ष देणाऱ्या दीक्षाभूमीवर धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त देशभरातून लाखो बौद्ध बांधव येतात. मंगळवारी मुख्य समारंभ होत आहे. यासाठी महापालिका प्रशासन सज्ज झाले आहे. येणाऱ्या भाविकांसाठी सोयीसुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. पाणी, शौचालय, स्नानगृह, बससेवा, दिवे, आरोग्य व स्वच्छता अशा स्वरूपाच्या सुविधा उपलब्ध करण्यासाठी मनपाची यंत्रणा सज्ज झाली आहे. दीक्षाभूमी परिसरात अस्थायी स्वरूपाची ९७० शौचालये, १०० स्नानगृहे उभारण्यात आलेली आहेत. आयटीआय परिसरात ४९० शौचालये, १०० स्नानगृहे उभारण्यात आलेली आहेत. माताकचेरी परिसरात १२० तर जेल परिसरात २४० शौचालये उभारण्यात आलेली आहेत. 


भाविकांना पिण्यासाठी पाणी उपलब्ध करण्याकरिता अस्थायी स्वरूपाचे २०२ नळ उभारण्यात आले आहेत. तसेच दीक्षाभूमी परिसर, अजनी रेल्वे स्टेशन, वर्धा रोड, अंबाझरी व अन्य भागातील भोजनगृहासाठी टँक रद्वारे पाणीपुरवठा के ला जात आहे. गायत्रीनगर, सुभाषनगर, अंबाझरी उद्यान येथील स्नानगृह व शौचालयासाठी तसेच भोजनदान कार्यक्रमासाठी ओसीडब्ल्यूतर्फे टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. भाविकांना विश्रांतीसाठी अंध विद्यालय, आयटीआय परिसरात शामियाना उभारण्यात आला आहे. दीक्षाभूमी येथे अग्निशमन विभागातर्फे २४ तास सेवा उपलब्ध करण्यात आली आहे. सुरक्षेच्या दृष्टीने परिसरात सीसीटीव्ही लावण्यात आले आहेत. 

सोमवारी महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी दीक्षाभूमीवरील तयारीची पाहणी करून आढावा घेतला. यावेळी अतिरिक्त आयुक्त राम जोशी, अधीक्षक अभियंता मनोज तालेवार, कार्यकारी अभियंता मनोज गणवीर, धनंजय मेंढुलकर, ए.एस. मानकर, अविनाश बारहाते, प्रमुख अग्निशमन अधिकारी राजेंद्र उचके, आरोग्य अधिकारी (स्वच्छता) डॉ. सुनील कांबळे, लक्ष्मीनगर झोनचे सहायक आयुक्त राजू भिवगडे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे सदस्य डॉ. सुधीर फुलझेले आदी उपस्थित होते. 

धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त देशाच्या विविध भागातून येणाºया अनुयायांना कोणताही त्रास होऊ नये, आवश्यक सुविधांसह परिसरात स्वच्छता राहावी, सर्वत्र पुरेशी विद्युत व्यवस्था असावी, पिण्याच्या शुद्ध पाण्याची व्यवस्था करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले.

अनुयायी घेणार प्लास्टिक मुक्तीची शपथ 
दीक्षाभूमीवर येणारे लाखो बौद्ध बांधव प्लास्टिक मुक्तीची शपथ घेणार आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी दीक्षाभूमीवरून अनुयायांना बौद्ध धम्माची वाट दाखवून नवी क्रांती घडवली होती. त्याच क्रांतिभूमीतून पर्यावरणपूरक उज्ज्वल भवितव्यासाठी प्लास्टिक मुक्तीची क्रांती घडणार आहे. नागपूर महापालिकेच्या ‘सिंगल यूज प्लास्टिक मुक्ती’ अभियानाद्वारे धम्मचक्र प्रवर्तनदिनी जनजागृती केली जाणार आहे.

प्लास्टिकमुक्ती जनजागृतीसाठी चमू 

सिंगल यूज प्लास्टिक मुक्तीबाबत जनजागृतीसाठी मनपाची चमू निर्धारित करण्यात आली आहे. या चमूद्वारे दीक्षाभूमी परिसरातील सर्व स्टॉल्सना भेट देऊन सिंगल यूज प्लास्टिकचा वापर टाळण्याबाबत जनजागृती केली जात आहे. सिंगल यूज प्लास्टिकमध्ये बंदी असलेल्या प्लास्टिकची माहिती दिली जात आहे. याशिवाय जनजागृती करणारी पत्रके वितरित करून नागरिकांना सिंगल यूज प्लास्टिकचा वापर न करण्याचे आवाहन केले जात आहे.

नियंत्रण कक्षांचे संपर्क क्रमांक
नागरिकांच्या सुविधेसाठी दीक्षाभूमी चौकातील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याजवळ महापालिकेचा नियंत्रण कक्ष व पोलीस नियंत्रण कक्ष उभारण्यात आला आहे. नागरिकांना येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी नियंत्रण कक्ष तैनात असून नागरिकांना येथे संपर्क साधता येईल. दीक्षाभूमी चौकातील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुतळ्याजवळ मनपाचे नियंत्रण कक्ष असून आकस्मिक परिस्थितीत मनपा नियंत्रण कक्षाला ०७१२-२२२७७११,०७१२-२२३४६५५, ०७१२-२२२७७०७ या क्रमांकावर तर पोलिसांना १००, रुग्णवाहिकेसाठी १०८, अग्निशमन सेवेसाठी ०७१२-२५६७७७७,०७१२-२५६७१०१ क्रमांकावर संपर्क साधून मदत मिळविता येईल.


Web Title: Municipal administration ready for Dhammachakra launch day
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.