मुनगंटीवारांकडून झिरवळांचा ‘क्लीनअप’! पाकिस्तानी सौंदर्यप्रसाधनाच्या मुद्यावरून चिमटे : सभागृहातला ‘नरहरी’ तरी वाचवेल, अशी आशा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2025 06:31 IST2025-12-13T06:30:21+5:302025-12-13T06:31:36+5:30
भीमराव तापकीर यांनी यासंदर्भात अर्धा तास चर्चा प्रस्ताव मांडला होता. चर्चेदरम्यान मुनगंटीवार म्हणाले, राज्यातील सौंदर्यप्रसाधन व खाद्यविक्री करणाऱ्या दुकानांची संख्या लाखांमध्ये आहे.

मुनगंटीवारांकडून झिरवळांचा ‘क्लीनअप’! पाकिस्तानी सौंदर्यप्रसाधनाच्या मुद्यावरून चिमटे : सभागृहातला ‘नरहरी’ तरी वाचवेल, अशी आशा
नागपूर : पुणे जिल्ह्यातील पिंपरी-चिंचवड परिसरात पाकिस्तानातून आलेले सौंदर्यप्रसाधन जप्त करण्याच्या मुद्द्यावर शुक्रवारी विधानसभेत जोरदार चर्चा रंगली. चर्चेदरम्यान भाजप आ. सुधीर मुनगंटीवार यांनी अन्न व औषध प्रशासनमंत्री नरहरी झिरवळ यांची चांगलीच कोंडी केली. पाकिस्तानातून सौंदर्यप्रसाधने येत आहेत आणि राज्याचा अन्न व औषध प्रशासन विभाग कर्मचाऱ्यांअभावी हलाखीचा सामना करतोय, वरचा ‘हरी’ वाचवेल का ठाऊक नाही, पण सभागृहातला ‘नरहरी’ तरी वाचवेल, अशी आशा आहे, असे म्हणत मुनगंटीवारांनी झिरवळ यांना चिमटे काढले.
भीमराव तापकीर यांनी यासंदर्भात अर्धा तास चर्चा प्रस्ताव मांडला होता. चर्चेदरम्यान मुनगंटीवार म्हणाले, राज्यातील सौंदर्यप्रसाधन व खाद्यविक्री करणाऱ्या दुकानांची संख्या लाखांमध्ये आहे. मात्र, विभागाकडे तपासणी करण्याइतके मनुष्यबळच नाही. विभागाने पूरक मागणीत २०० कोटी मागितले होते; परंतु फक्त ३५ कोटींचेच बजेट देण्यात आल्याची टीका त्यांनी केली. यावर निवेदन करताना मंत्री झिरवळ यांनी विभागात कर्मचाऱ्यांची कमतरता असल्याचे मान्य केले. राज्यात मुंबई, नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर येथेच प्रयोगशाळा असून आणखी दोन ठिकाणी लॅब उभारण्याचे नियोजन असल्याचे त्यांनी सांगितले. केंद्र सरकारच्या निकषांनुसार विभागाला ७०० कर्मचाऱ्यांची गरज असून सध्या केवळ २०० पदांचीच मंजुरी आहे, त्यापैकीही अनेक पदे रिक्त आहेत. एमपीएससीमार्फत भरती प्रक्रिया सुरू असून मार्चपर्यंत विभागाला आवश्यक तेवढे अन्न व औषध निरीक्षक आणि इतर कर्मचारी उपलब्ध होतील, असे त्यांनी स्पष्ट केले. राज्यात सुमारे दीड लाख दुकाने सौंदर्य प्रसाधनांची विक्री करतात. मात्र, उत्पादन करणाऱ्या कंपनीला परवान्याची आवश्यकता असते, विक्रीसाठी परवाना बंधनकारक नाही. त्यामुळे या दुकानांना परवान्याच्या कक्षेत आणता येईल का, याचा सरकार विचार करत असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, त्यासाठी सर्व दुकाने शोधून काढण्यास मोठा कालावधी लागेल, असेही त्यांनी नमूद केले.
विशेष तपास पथकाद्वारे चौकशी
पाकिस्तानी सौंदर्यप्रसाधने जप्त केल्यानंतर प्रकरण पोलिसांकडे सोपवले गेले. मात्र, चौकशीची गती समाधानकारक नसल्याचे दिसते. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून पोलिसांची विशेष तपास पथक (एसआयटी) नियुक्त करण्याचा निर्णय घेतला जाईल, असे मंत्री नरहळी झिरवळ यांनी आश्वस्त केले.