लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : वेगाशी मैत्री करत मुंबईकडे निघालेल्या दुरंतो एक्सप्रेसमधील एका प्रवासी महिलेला प्रसव कळा तीव्र झाल्या. परिणामी तिच्या पतीसह सहप्रवाशांच्याही हृदयाची धडधड वाढली. मात्र, माहिती कळताच स्थानिक रेल्वे पोलिसांनी तत्परता दाखवून महिलेला तात्काळ वैद्यकीय मदत मिळवून दिली. परिणामी तिने एका गुटगुटीत बाळाला जन्म दिला.
या घटनेतील महिला गृहिणी असून तिचे पती टेलर आहे. टेलर त्याच्या गर्भवती पत्नीला घेऊन ट्रेन नंबर १२२६२ हावडा मुंबई दुरंतो एक्सप्रेसने मुंबईकडे जात होते. बुधवारी मध्यरात्री गाडी नागपूरजवळ आली असताना महिलेला तीव्र प्रसवकळा सुरू झाल्या. त्यामुळे ती वेदनांनी तळमळू लागली. ते बघून तिच्या पतीसह ट्रेनमध्ये असलेल्या सहप्रवाशांच्याही जीवाची धडधड वाढली. गाडी नागपूर स्थानकावर पोहचताच प्रवाशांनी कर्तव्यावर असलेल्या रेल्वे पोलीस कर्मचाऱ्यांना ही माहिती दिली. पोलिसानी लगेच दखल घेत या महिलेला कोच नंबर एक मधून सुखरूप बाहेर काढून मेयो ईस्पितळात दाखल केले. तेथे मध्यरात्री १२.३० च्या सुमारास महिलेने एका गुटगुटीत बाळाला जन्म दिला.
बाळ-बाळंतीण दोघेही उत्तममहिला आणि तिचे बाळ दोघांचीही प्रकृती चांगली असल्याचे डॉक्टरांनी सांगताच महिलेच्या पतीच्या भावना भरून आल्या. त्याने आज सकाळी भरल्या डोळ्यांनी रेल्वे पोलिसांचे आभार मानले.
पोलिसांच्या तत्परतेचे काैतूकआज पहाटेपासून या घटनेची रेल्वेच्या वर्तुळात चर्चा सुरू आहे. संबंधित प्रवासी जोडपेच नव्हे तर वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही रेल्वे पोलिसांच्या तत्परतेचे काैतूक केले आहे. रेल्वेचे पोलीस अधीक्षक मंगेश शिंदे यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक गाैरव गावंडे आणि उपनिरीक्षक अमोद इंगळे, हवळदार भांडारकर, दीपाली स्वामी, कॉन्स्टेबल ठाकूर, यादव तसेच पूजा आगासे यांनी ही प्रशंसनीय कामगिरी बजावली.