मुकुलिका जवळकर, नितीन बोरकर हायकोर्ट न्यायमूर्ती?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2019 23:50 IST2019-09-27T23:49:36+5:302019-09-27T23:50:34+5:30
सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमने नागपूरकर न्यायिक अधिकारी मुकुलिका जवळकर व नितीन बोरकर यांची मुंबई उच्च न्यायालयात अतिरिक्त न्यायमूर्तीपदी नियुक्ती करण्याची केंद्र सरकारला शिफारस केली आहे.

मुकुलिका जवळकर, नितीन बोरकर हायकोर्ट न्यायमूर्ती?
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : विधी क्षेत्रामध्ये नागपूरच्या शिरपेचात पुन्हा एकदा मानाचा तुरा खोचल्या गेला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमने नागपूरकर न्यायिक अधिकारी मुकुलिका जवळकर व नितीन बोरकर यांची मुंबई उच्च न्यायालयात अतिरिक्त न्यायमूर्तीपदी नियुक्ती करण्याची केंद्र सरकारला शिफारस केली आहे. यासंदर्भातील ठराव जाहीर करण्यात आला आहे.
या दोघांव्यतिरिक्त वकिलांमधून अॅड. अमित बोरकर तर, न्यायिक अधिकाऱ्यांमधून एम. जी. सेवलीकर, व्ही. जी. बिष्ट, बी. यू. देबडवार, एस. पी. तावडे व एस. डी. कुलकर्णी यांचीही अतिरिक्त न्यायमूर्तीपदी नियुक्ती करण्याची शिफारस करण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश रंजन गोगोई, न्या. शरद बोबडे व न्या. एन. व्ही. रामना यांचा समावेश असलेल्या कॉलेजिमयने ही शिफारस केली आहे.
मुंबई उच्च न्यायालयाचे तत्कालीन मुख्य न्यायमूर्तींनी दोन वरिष्ठ न्यायमूर्तींशी चर्चा केल्यानंतर गेल्या ११ मार्च रोजी या विधिज्ञांची न्यायमूर्तीपदी नियुक्ती करण्याची कॉलेजियमला शिफारस केली होती. मुकुलिका जवळकर व नितीन बोरकर या दोघांनी नागपूरमध्ये काही वर्षे वकिली व्यवसाय केला. त्यानंतर त्यांची जिल्हा न्यायाधीश म्हणून निवड करण्यात आली. न्यायिक अधिकारी म्हणून सर्वोत्तम कार्य केल्यामुळे त्यांना उच्च न्यायालयात बढती मिळण्यासाठी पात्र ठरविण्यात आले आहे.