दिवाळखोरीच्या उंबरठ्यावरील महावितरणची ५० कोटींची फसवणूक; अद्याप तक्रार दाखल नाही
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2022 06:46 IST2022-03-17T06:46:12+5:302022-03-17T06:46:19+5:30
वर्ध्यातील ‘महालक्ष्मी टीएमटी’वर मेहरबानी का?

दिवाळखोरीच्या उंबरठ्यावरील महावितरणची ५० कोटींची फसवणूक; अद्याप तक्रार दाखल नाही
- आशीष रॉय
नागपूर : दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर असलेल्या महावितरणला वरिष्ठ अधिकारी आणखी दरीत ढकलत असल्याचे दिसते. एमएसईडीसीएलच्या मुख्य कार्यालयाने वर्धास्थित स्टील प्लान्ट महालक्ष्मी टीएमटीला (एसएमडब्लू इस्पात) अक्षरश: ५० कोटी रुपये भेट दिले असल्याची बाब ‘लोकमत’कडे उपलब्ध असलेल्या कागदपत्रांवरून स्पष्ट झाली आहे.
कंपनीने फसवणूक केली असतानाही महावितरणने अद्यापही पोलीस तक्रार केलेली नाही. मुख्य जनसंपर्क अधिकारी अनिल कांबळे याबाबत स्पष्टीकरण देऊ शकले नाहीत. महालक्ष्मी टीएमटीने विदर्भ मराठवाडा औद्योगिक अनुदान योजनेचा अवैध लाभ घेत अधिकाऱ्यांशी संगनमत करत महावितरणला ४९.२१ कोटी रुपयांचा गंडा घातला. हा एक ‘ओपन ॲक्सेस’ ग्राहक होता व त्यांचे महावितरण कनेक्शनदेखील होते.